पिंपरीत जीबीएसचा धोका? पिण्याच्या पाण्याची तपासणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 09:51 IST2025-01-29T09:51:48+5:302025-01-29T09:51:54+5:30
‘वायसीएम’, नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये मोफत उपचार

पिंपरीत जीबीएसचा धोका? पिण्याच्या पाण्याची तपासणी सुरू
पिंपरी : ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) या आजाराचे शहरात १५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दूषित पाण्याद्वारे आजाराचा प्रसार होण्याची शक्यता गृहीत धरून शहरातील खासगी विहिरी, बोअरवेल, टँकरमार्फत पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तपासणी केली जाणार आहे. पिण्याचे पाणी जारद्वारे वितरित करणाऱ्या ठिकाणांचीही तपासणी करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या वैद्यकीय आणि पाणीपुरवठा विभागाची संयुक्त बैठक घेऊन आयुक्तांनी आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी उपस्थित होते.
‘वायसीएम’, नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये मोफत उपचार
या आजारावर उपचारासाठी आवश्यक असणारे औषधोपचार यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह (वायसीएम) इतर रुग्णालयांत उपलब्ध आहेत. या आजाराचे उपचार ‘एकत्रित महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’मध्ये समाविष्ट आहेत. वायसीएम रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये या योजनेअंतर्गत रुग्णांकरिता मोफत उपचार केले जाणार आहेत.
३,९८६ घरांची तपासणी
शहरात या आजाराचे १५ संशयित रुग्ण आहेत. सर्व दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या आजाराचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात सर्वेक्षण करण्याकरिता आठ रुग्णालय विभागांतर्गत प्रत्येकी दोन अशी एकूण १६ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत आजअखेर तीन हजार ९८६ घरे तपासण्यात आली आहेत. यामध्ये जीबीएस आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.