देवाभाऊचा, दादांचा किंवा कोणाचाही असो,फ्लेक्स लावणाऱ्यांना मतदान करू नका; अजित पवारांचा स्पष्ट सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 20:11 IST2025-08-23T20:10:58+5:302025-08-23T20:11:47+5:30
फ्लेक्स लावणारे काम कमी करतात, त्यामुळे ज्यांचे जास्त फ्लेक्स दिसतील त्यांना मतदान करू नका,” असा स्पष्ट सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

देवाभाऊचा, दादांचा किंवा कोणाचाही असो,फ्लेक्स लावणाऱ्यांना मतदान करू नका; अजित पवारांचा स्पष्ट सल्ला
पिंपरी : शहरात अनधिकृत फ्लेक्स लावले जात आहेत. गणपतीतही याचा पाढा सुरू होतो. कोणाचाही बॅनर असो – देवाभाऊचा, अजितदादांचा किंवा इतर कोणाचाही – त्यावर कारवाई होणारच. फ्लेक्स लावणारे काम कमी करतात, त्यामुळे ज्यांचे जास्त फ्लेक्स दिसतील त्यांना मतदान करू नका,” असा स्पष्ट सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण सन्मान सोहळा व सर्वेक्षणाचा प्रारंभ शनिवारी (दि. २३) त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे, खासदार विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे, विजयकुमार खोराटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, कविता आल्हाट, नाना काटे, शाम लांडे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, “कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्राबरोबरच स्वच्छता दूतांचा मोलाचा वाटा दिसून आला. शहरात १४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. मात्र, लोकांची खरेदी क्षमता वाढल्याने कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. स्वच्छतेसाठी ड्रेनेज दुरुस्तीची यंत्रणा, शून्य झोपडपट्टी कचरा प्रकल्प, छोटे एसटीपी आणि आरओ प्लांट यावर महापालिका काम करत आहे. इंदोर शहर पहिल्या क्रमांकावर येते, कारण तेथे राजकारण आणि प्रशासनाने एकत्रितपणे जबाबदारी घेतली. पिंपरी-चिंचवडलाही अशीच सुधारणा करावी लागेल.”
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, तसेच हॉकर्सना चांगली जागा देऊन सुयोग्य हॉकर्स झोन तयार करावा, असेही त्यांनी सांगितले. हिंजवडी-चाकण भागात वाहतूक कोंडी सोडवण्याचे आणि पुढील ५० वर्षांचे नियोजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
चाकण, हिंजवडीची वाहतूक कोंडी सोडवणारच : पवार
पवार म्हणाले, हिंजवडी, चाकण या भागामध्ये सध्या बदल होत आहेत. तेथील वाहतूक कोंडी सोडविणे गरजेचे बनले आहेत. ते आम्ही करणारच आहोत. त्या शहरांच्या उद्याच्या पन्नास वर्षाचे प्लॅनिंग करत आहोत. त्यामुळे तेथील कोंडी आम्ही सोडविणारच आहोत.
आयुक्तांचा स्वभाव हट्टी : बारणे
खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी महापालिकेवर नद्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल टीका केली. तसेच आयुक्त शेखर सिंह यांचा स्वभाव हट्टी असला तरी काम मात्र दमदार करतात, असे म्हणत त्यांच्यावरही उपरोधात्मक टिप्पणी केली.