भुशी धरणाकडे जाणारा रस्ता तीन वाजता बंद करु नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 21:08 IST2019-06-20T21:07:44+5:302019-06-20T21:08:28+5:30
पावसाळा हा लोणावळ्यातील पर्यटनाचा मुख्य हंगाम असल्याने याठिकाणी वर्षा विहाराचा आनंद घेण्याकरिता लाखो पर्यटक येत असतात...

भुशी धरणाकडे जाणारा रस्ता तीन वाजता बंद करु नका
लोणावळा : पावसाळी पर्यटनाचे लोणावळ्यातील सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असलेल्या भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी तीन वाजता बंद करु नका, अशी मागणी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने आज निवेदनाद्वारे लोणावळा शहर पोलिसांकडे करण्यात आली.
पावसाळा हा लोणावळ्यातील पर्यटनाचा मुख्य हंगाम असल्याने याठिकाणी वर्षा विहाराचा आनंद घेण्याकरिता लाखो पर्यटक येत असतात. येथील भुशी धरणाच्या पायर्यांवर बसून चिंब भिजण्याचा आनंद घेण्याकडे पर्यटकांचा सर्वाधिक ओढा असतो. मात्र, यामुळे निर्माण होणारी वाहतुक कोंडी सोडविण्याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने गर्दीच्या वेळी भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी तीन वाजता बंद केला जातो. भुशी धरण व परिसरात राहणार्या नागरिकांचा तसेच लोणावळ्यातील व्यवसायकांकरिता हा सुगीचा कालावधी असताना या काळात रस्ता बंद केल्याने त्यांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होत आहे. याकरिता धरणाकडे जाणारा रस्ता खुलाच ठेवावा तसेच टपरी व लहान व्यावसायकांना रात्री दिड वाजेपर्यत दुकाने खुली ठेवण्याची मुबा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनावर पावसाळ्यात अतिरिक्त ताण येत असल्याने त्यांना पोलीस मित्र म्हणून पक्षाचे स्वंयसेवक देखिल उपलब्ध करुन दिले जातील असे देखिल या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला संघटक व नगरसेविका शादान चौधरी, लोणावळा शहरप्रमुख नगरसेवक सुनिल इंगूळकर, नगरसेविक शिवदास पिल्ले, सिंधू परदेशी, विजय आखाडे व शिवसैनिक यांनी पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले आहे.