पिंपरी-चिंचवड शहरात विस्कळीत पाणीपुरवठा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंची कबुली

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: March 6, 2025 18:54 IST2025-03-06T18:53:34+5:302025-03-06T18:54:28+5:30

भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत तारांकित प्रश्न विचारला हाेता

Disrupted water supply in Pimpri-Chinchwad city Deputy Chief Minister Eknath Shinde admits | पिंपरी-चिंचवड शहरात विस्कळीत पाणीपुरवठा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंची कबुली

पिंपरी-चिंचवड शहरात विस्कळीत पाणीपुरवठा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंची कबुली

पिंपरी : शहराची लाेकसंख्या झपाट्याने वाढत असून, ३५ लाख लाेकसंख्येसाठी ७५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत ६२० एमएलडी पाणीपुरवठा केला जाताे. त्यामुळे शहरात पाणीपुरवठा विस्कळीत हाेत असल्याची कबुली उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत तारांकित प्रश्न विचारला हाेता. शहराच्या पाणी नियाेजनासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाकडून शासनाला पाण्याच्या नियाेजनाबाबत विचारणा केली आहे का, पाण्याचे नियाेजन झाले नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच गृहनिर्माण संस्थांना विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याबाबत माेठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त हाेत आहेत. तक्रारींच्या अनुषंगाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काेणती कार्यवाही केली, असे प्रश्न विचारले. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले आहे.

महापालिकेच्या हद्दीतील गृहनिर्माण संस्थांना विस्कळीत पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारीत तथ्य आहे. महापालिकेमार्फत सद्यस्थितीत पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८०, एमआयडीसीकडून २० असे ६२० एमएलडी पाणी उचलले जाते. या पाण्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराची लाेकसंख्या ३५ लाखांच्या घरात गेली आहे. या लाेकसंख्येसाठी ७५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी उचलण्यासाठी जलवाहिनी टाकण्यासह इतर कामे प्रगतिपथावर आहेत. डिसेंबर २०२५ अखेर ही कामे पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियाेजन आहे. पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी पाण्याचे अतिरिक्त जलकुंभ (टाक्या), जलवाहिनी टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर कमी पाणीपुरवठा हाेणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पुरेसा पाणीपुरवठा हाेण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Disrupted water supply in Pimpri-Chinchwad city Deputy Chief Minister Eknath Shinde admits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.