नशेच्या धुंदीत घरात घुसणे पडले महागात,चोरट्याला गमवावा लागला जीव; भोसरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 15:50 IST2020-08-18T15:48:46+5:302020-08-18T15:50:29+5:30
आरडाओरडा झाल्याने नागरिकांनी चोरट्याला पकडत बांधून ठेवले..

नशेच्या धुंदीत घरात घुसणे पडले महागात,चोरट्याला गमवावा लागला जीव; भोसरीतील घटना
पिंपरी : नशेत असलेला चोरटा घरात घुसला. त्यामुळे आरडाओरडा झाल्याने नागरिकांनी त्याला पकडून बांधून ठेवले. त्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान चोरट्याचा मृत्यू झाला. भोसरी येथे मंगळवारी (दि. १८) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
संतोष महादेव हावसे (वय २७, रा. दिघी) असे मृत्यू झालेल्या चोरट्याचे नाव आहे.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हावसे हा मोलमजुरी करीत होता. तसेच तो व्यसनाधीन होता. सतत नशेत असायचा. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास भोसरी येथील एका घरात तो घुसला. त्यावेळी घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केला. त्यामुळे नागरिकांनी संतोष याला पकडून बांधून ठेवले. घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याबाबत तक्रार देण्यासाठी त्यांनी भोसरी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
बांधून ठेवलेला संतोष हावसे हा बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसून आल्यामुळे पोलिसांनी त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संतोष हावसे याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.