बांधकाम प्रकल्पावर कंत्राटदाराचा मृत्यू; बाराव्या मजल्यावरून पडल्याने दुर्घटना
By नारायण बडगुजर | Updated: April 7, 2024 17:51 IST2024-04-07T17:50:56+5:302024-04-07T17:51:31+5:30
बांधकाम प्रकल्पावर सुरक्षारक्षक साहित्य न पुरविल्याने ही घटना घडली

बांधकाम प्रकल्पावर कंत्राटदाराचा मृत्यू; बाराव्या मजल्यावरून पडल्याने दुर्घटना
पिंपरी : बांधकाम साइटवर बाराव्या मजल्यावर कन्स्ट्रक्शन लिफ्टचे दुरुस्तीचे काम करत असताना तोल जाऊन पडल्याने कंत्राटदाराचा मृत्यू झाला. पुनावळे येथील सोमानी टॉवर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साइटवर ९ मार्च रोजी ही घटना घडली.
तायप्पा भुसाप्पा (३९, रा. पुनावळे. मूळ रा. कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. यलाप्पा आद्याप्पा यादगीर (३२, रा. पुनावळे. मूळ रा. कर्नाटक) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ६) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पर्यवेक्षक मनोज पवार (३६, रा. पुनावळे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यलाप्पा यांचे नातेवाईक असलेले कंत्राटदार तायप्पा हे सोमानी टॉवर या बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावर कन्स्ट्रक्शनचा माल वरती घेऊन जाणाऱ्या लिफ्टच्या दुरुस्तीचे काम करत होते. काम करत असताना त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते बाराव्या मजल्यावरून जमिनीवर पडले. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन तायप्पा यांचा मृत्यू झाला. पर्यवेक्षक मनोज पवार यांनी बांधकाम प्रकल्पावर सुरक्षारक्षक साहित्य न पुरविल्याने ही घटना घडली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक के. के. गिरीगोसावी तपास करीत आहेत.