दापोडी, फुगेवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी १९ तास अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:12 IST2026-04-04T13:09:46+5:302026-04-04T13:12:40+5:30

- वादळी पावसात वीजपुरवठा ठप्प; महावितरणच्या नियोजनावर संघटनांचा सवाल

Dapodi, Phugewadi, Sangvi, Pimple Gurav, Kasarwadi in darkness for 19 hours | दापोडी, फुगेवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी १९ तास अंधारात

दापोडी, फुगेवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी १९ तास अंधारात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी, फुगेवाडी, सांगवी (जुनी-नवीन), पिंपळे गुरव आणि कासारवाडी या भागांत तब्बल १९ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. गुरुवारी दुपारी दोनपासून शुक्रवारी सकाळी सव्वा नऊपर्यंत वीज नसल्याने हजारो कुटुंबांना अंधारात रात्र काढावी लागली. यामुळे काही भागांत पाणीपुरवठाही विस्कळीत झाला होता.

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात असले तरी ही घटना पूर्णतः नैसर्गिक होती की ‘महावितरण’च्या अपुऱ्या नियोजनाचा परिणाम, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना करण्याची मागणी ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूहाने केली आहे.

वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून अपेक्षित तयारी दिसून न आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे आपत्कालीन व्यवस्थापनाची पोलखोल झाल्याची टीका नागरिकांतून होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

पूर्वसूचना होती का?

भारतीय हवामान विभागाकडून वादळी पावसाची पूर्वसूचना दिली का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पूर्वसूचना मिळाल्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी का घेण्यात आली नाही, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही, असे संघटनेने म्हटले आहे.

चौकशीची मागणी

हवामान पूर्वसूचना व महावितरणची तयारी याची चौकशी करावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, प्रभावित नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी. आपत्कालीन वीजपुरवठा यंत्रणा मजबूत करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेबाबत ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूहाचे अध्यक्ष सरदार रवींद्र सिंह यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Web Title : पिंपरी-चिंचवड क्षेत्र 19 घंटे बिजली गुल रहने से अंधेरे में डूबा

Web Summary : दापोडी और आसपास के पिंपरी-चिंचवड इलाके 19 घंटे बिजली गुल रहने से प्रभावित हुए, जिससे पानी की आपूर्ति और दैनिक जीवन बाधित हुआ। नागरिकों ने तूफान के दौरान अपर्याप्त तैयारी के लिए महावितरण से जवाबदेही की मांग की और बिजली गुल होने से हुई असुविधा के लिए मुआवजे का अनुरोध किया।

Web Title : Pimpri-Chinchwad Areas Plunged into Darkness for 19 Hours Due to Power Outage

Web Summary : Dapodi and surrounding Pimpri-Chinchwad areas faced a 19-hour power outage, disrupting water supply and daily life. Citizens demand accountability from Mahavitran for inadequate preparedness during the storm and request compensation for the inconvenience caused due to power failure.