पिंपरीत साकारणार १२६ कोटींचे मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:48 IST2025-01-22T19:24:39+5:302025-01-22T19:48:29+5:30

पंधरा मजली निवासी इमारत : आठ मजली प्रबोधिनी इमारत

Central fire headquarters worth Rs 126 crore to be built in Pimpri | पिंपरीत साकारणार १२६ कोटींचे मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय

पिंपरीत साकारणार १२६ कोटींचे मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय

पिंपरी : महापालिकेच्या वतीने पिंपरीतील गांधीनगरमधील महिंद्रा कंपनीच्या जागेत मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय उभारण्यात येणार आहे. त्यात आठ मजली प्रबोधिनी इमारत, १५ मजली निवासी इमारत, २२ अग्निशमन बंब बसतील अशी पार्किंग, अग्निशमन कार्यालय व कार्यशाळा, संग्रहालय व प्रेक्षागृह असणार आहे. त्यासाठी तब्बल १२६ कोटी २४ लाख ३० हजार २७३ रुपये खर्च करण्यात येणार आहे.

अग्निशमन विभागाचे मध्यवर्ती मुख्यालय सध्या संत तुकारामनगर येथे आहे. तेथील जागा अपुरी पडत असल्याने नव्या प्रशस्त ठिकाणी मुख्यालय बांधण्याचे नियोजन होते. पिंपरी येथील महिंद्रा कंपनीकडून ‘आय टू आर’ अंतर्गत मिळालेल्या ५.५ एकर जागेत हे मुख्यालय बांधण्यात येणार आहे.

संग्रहालय, दोनशे आसन क्षमतेचे प्रेक्षागृह

या जागेत आठमजली प्रबोधिनी इमारत उभारली जाणार आहे. अग्निशमन संग्रहालय, दोनशे जणांच्या आसन क्षमतेचे प्रेक्षागृह, ५० आसन क्षमतेचे सेमिनार रूम, १०० प्रशिक्षणार्थी व ११८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था असणार आहे. त्यात फायरमन व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अग्निशमन विभागात काम करणारे फायरमन व इतर कर्मचाऱ्यांसाठी १५ मजली निवासी इमारत बांधण्यात येणार आहे. २२ अग्निशमन बंब उभे करता येतील, अशी पार्किंग असणार आहे. अग्निशमन कार्यालय व कार्यशाळा, कवायत करण्यासाठी मैदान असणार आहे. इतर वाहनांची दोन मजली पार्किंग व्यवस्था आहे.

नव्या महापालिका भवनामुळे प्रस्ताव रद्द

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील महिंद्रा कंपनीच्या जागेत मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय बांधण्याचा निर्णय झाला होता. पुढे महापालिका भवनाशेजारी जागा असल्याने नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचा निर्णय झाला. त्यासाठी दोन्ही इमारती पादचारी मार्गाने जोडण्यात येणार होत्या. मात्र, तो निर्णय बदलण्यात आला. त्यानंतर चिंचवड येथील सायन्स पार्कसमोर १८ मजली महापालिका भवन उभारण्याचा निर्णय झाला. ते काम सध्या वेगात सुरू आहे. त्यामुळे आता पिंपरीच्या जागेत अग्निशमन मुख्यालय बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात लोकवस्ती वाढत आहे. त्यादृष्टीने अद्ययावत असे व सर्व सुविधायुक्त मुख्यालय येथे उभारण्यात येणार आहे. मुख्यालयाद्वारे पिंपरी-चिंचवड परिसरातील अग्निशमन सेवेची कार्यक्षमता व प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा उद्देश आहे. - प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका 

Web Title: Central fire headquarters worth Rs 126 crore to be built in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.