बालविवाह प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल; आळंदी येथील मंगल कार्यालयाच्या संचालकावरही गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 18:29 IST2025-01-11T18:27:14+5:302025-01-11T18:29:16+5:30
आळंदी येथे वडगाव रस्त्यावरील गंधर्व मंगल कार्यालयात २१ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

बालविवाह प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल; आळंदी येथील मंगल कार्यालयाच्या संचालकावरही गुन्हा
पिंपरी : आळंदी येथे बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या पतीसह १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आळंदी येथे वडगाव रस्त्यावरील गंधर्व मंगल कार्यालयात २१ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
गौरव सुभाष मुरक्या (रा. साळवेश्वर नगर, ब्रह्मा-विष्णू महेश अपार्टमेंटच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी), याच्या सोबत बालिका वधुची आई, मामा, मामी (तिघे रा. कारेगाव, पुणे), सासरे स॒भाष भोलाराम, सासू, शुभम सुभाष मुरक्या, जाउ, संतोष भोलाराम मुरक्या, प्रमोद भोलाराम मुरक्या (रा. परभणी), तसेच वडगाव रस्त्यावरील गंधर्व मंगल कार्यालयाचे संचालक व इतर सेवा पुरवणारे व्यवस्थापक यांच्यासह एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मिलिंद सोपानराव वाघमारे (४५, रा. परभणी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १०) आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद वाघमारे हे परभणी येथील नागरी पक्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी तथा परभणी येथील शहर विभागाचे बालविवाह प्रतिबंध अधिकारी आहेत. १७ वर्ष पाच महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे गौरव मुरक्या याच्यासोबत संशयितानी लग्न लावून दिले. तसेच इतर संशयितांनी हा बालविवाह करण्यासाठी मदत केली. या बालविवाहाबाबत मिलिंद वाघमारे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.