म्हाळुंगे एमआयडीसीत उद्योजकावर गोळीबार; उद्योजक जखमी, परिसरात खळबळ
By नारायण बडगुजर | Updated: January 20, 2025 13:41 IST2025-01-20T13:40:57+5:302025-01-20T13:41:05+5:30
गोळीबार करणारे दोघे अज्ञात दुचाकीवरून वराळे ते भांबोलीच्या दिशने पळून गेले असून पोलिसांकडून शोध सुरु

म्हाळुंगे एमआयडीसीत उद्योजकावर गोळीबार; उद्योजक जखमी, परिसरात खळबळ
पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी उद्योजकावर गोळीबार केला. यात उद्योजक जखमी झाला. म्हाळुंगे एमआयडीसी येथे सोमवारी (दि. २०) सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, अजय सिंग असे गोळीबारात जखमी झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. अजय सिंग यांची म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्टील कंपनी आहे. अजय सिंग हे सोमवारी सकाळी कंपनीत आले. त्यांच्या मागोमाग एका दुचाकीवरून दोन जण आले. दोघांनी हेल्मेट घातलेले होते. त्यांनी अजय सिंग यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात एक गोळी अजय सिंग यांच्या पोटाला लागली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोळीबार झाल्याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गोळीबार करणारे दोघे अज्ञात दुचाकीवरून वराळे ते भांबोलीच्या दिशने पळून गेले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे शहर व पुणे ग्रामिण पोलिसांना देखील याबाबत माहिती दिली.