पुन्हा बुलडोझर...! सलग दुसऱ्या दिवशी ६०७ बांधकामे पाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 11:52 IST2025-02-10T11:51:30+5:302025-02-10T11:52:14+5:30

महापालिका आक्रमक, अनधिकृत भंगार गोदामे, पत्राशेड, कारखाने भुईसपाट करूनच मोहीम थांबणार

Bulldozers again! 607 structures demolished for the second consecutive day | पुन्हा बुलडोझर...! सलग दुसऱ्या दिवशी ६०७ बांधकामे पाडली

पुन्हा बुलडोझर...! सलग दुसऱ्या दिवशी ६०७ बांधकामे पाडली

कुदळवाडीत अतिक्रमणांवर कारवाई सुरूच 

पिंपरी : चिखलीतील कुदळवाडी भागात सलग दुसऱ्या दिवशी आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि क्षेत्रीय धडक कारवाई पथकांमार्फत करण्यात आलेल्या या कारवाईत रविवारी ६८ लाख ७८ हजार चौरस फूट बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ६०७ बांधकामांचा समावेश होता.

महापालिका आणि पोलिस यंत्रणेने संयुक्तरीत्या राबविलेल्या या कारवाईमध्ये पहिल्या दिवशी २२२ आणि रविवारी दुसऱ्या दिवशी ६०७ बांधकामांवर कारवाई करण्यात आली. रविवारी झालेल्या कारवाईदरम्यान आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता सुनील बागवानी यांच्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलिस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

१८० जवान, ६०० पोलिस

महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलिस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर या कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिकाही येथे तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिका यंत्रणेसह पोलिस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले होते.

 

 

महापालिकेच्या आरक्षित जागेवर तसेच डीपी रस्त्यांवर असलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांवर ब्लॉकनिहाय अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असून, या भागामध्ये ज्यांचे साहित्य किंवा मशिनरी असतील, त्यांनी त्या तत्काळ काढून घ्याव्यात आणि महापालिकेस सहकार्य करावे. - प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: Bulldozers again! 607 structures demolished for the second consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.