"ऑफिसमध्ये पैसे आणून दे", मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थापकाकडे धनंजय मुंडेचे नाव घेऊन मागितले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 21:16 IST2022-12-09T21:15:01+5:302022-12-09T21:16:08+5:30
अज्ञात आरोपीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

"ऑफिसमध्ये पैसे आणून दे", मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थापकाकडे धनंजय मुंडेचे नाव घेऊन मागितले पैसे
पिंपरी : मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थापकाला फोन करून धनजंय मुंडे यांच्या ऑफीसमधून बोलत असल्याचे सांगत पैशाची मागणी केली. तसेच शिवीगाळ करत दम दिला. ही घटना शुक्रवारी (दि.९) घडली. या प्रकरणी शिवदास साधू चिलवंत (४१, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार फिर्याद दिली. त्यानुसार फोन करणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मेट्रोच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या खासगी एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. शुक्रवारी सकाळी घरी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवर बोलत असणाऱ्या व्यक्ती तो धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलतो असल्याचे सांगत फिर्यादी यांच्याकडे पैशाची मागणी केली. तसेच, शिवाजीनगर येथील डीएमच्या ऑफिसमध्ये पैसे आणून दे, असे म्हणून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.