पिंपरीत भाजपच्या नगरसेवकाला अटक! प्राधिकरणाची जागा विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 14:34 IST2021-05-28T14:33:39+5:302021-05-28T14:34:15+5:30
नगरसेवक राजेंद्र लांडगे सहित एक जण पोलिसांच्या ताब्यात

पिंपरीत भाजपच्या नगरसेवकाला अटक! प्राधिकरणाची जागा विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर
पिंपरी: पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा बनावट कागदपत्रे तयार करून विकल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपचे नगरसेवक राजेंद्र लांडगे आणि एकाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. भोसरी येथे २० मे २०२१ रोजी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
भाजपाचे नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय ४२), मनोज महिंद्र शर्मा (वय ३८, दोघेही रा. भोसरी), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह रविकांत सुरेंद्र ठाकूर (वय ४०, रा. भोसरी) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अभियंता तथा क्षेत्रीय अधिकारी एस. एस. भुजबळ (वय ३७) यांनी या प्रकरणी गुरुवारी (दि. २७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची भोसरी येथील सर्व्हे नं. २२ ही प्राधिकरणाची जागा विकत असल्याचे दाखवले. त्यातील ९३६ चौरस फूट जागा स्वतः मालक नसताना विक्री केली. खोटे नोटराईज, बनावट कागदपत्र, कुलमुखत्यारपत्र, संमतीपत्र, ताबा पावती, ताबा साठेखत बनवून लांडगे यांनी ती जागा शर्मा व ठाकूर यांना विक्री करून त्यापोटी १५ लाख ८० हजार रुपये घेतले.
लांडगे हा मूळ मालक नसून ती जागा प्राधिकरणाची आहे, असे माहिती असतानाही शर्मा व ठाकूर यांनी ती जागा विकत घेतली. तसेच त्यावर अनाधिकृत १ हजार ८७२ चौरस फूट बांधकाम केले. त्यानंतर बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मिळकत कर पावती बनवून घेतली. बनावट कागदपत्रे देत वीज कनेक्शन देखील घेऊन शासनाची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम तपास करीत आहेत.
कोण आहेत राजेंद्र लांडगे
राजेंद्र लांडगे हे भाजपचे नगरसेवक आहेत. तसेच महापालिकेच्या स्थायी समितीचे ते माजी सदस्य आहेत. महापालिकेच्या 'क' प्रभाग समितीचे ते विद्यमान सभापती आहेत. फसवणूक प्रकरणी त्यांना अटक झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.