भोसरी पोलिस ठाणे ठरले ‘सर्वोत्कृष्ट’; राज्यातील पाच पोलिस ठाण्यांची निवड

By नारायण बडगुजर | Updated: December 31, 2024 16:21 IST2024-12-31T16:20:32+5:302024-12-31T16:21:18+5:30

पिंपरी : राज्यातील गुन्हेगारीला प्रतिबंध घालणाऱ्या, कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस ठाण्यांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील भोसरी पोलिस ठाण्यानेही बाजी ...

Bhosari Police Station was declared 'best'; Five police stations in the state were selected | भोसरी पोलिस ठाणे ठरले ‘सर्वोत्कृष्ट’; राज्यातील पाच पोलिस ठाण्यांची निवड

भोसरी पोलिस ठाणे ठरले ‘सर्वोत्कृष्ट’; राज्यातील पाच पोलिस ठाण्यांची निवड

पिंपरी : राज्यातील गुन्हेगारीला प्रतिबंध घालणाऱ्या, कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस ठाण्यांमध्ये पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयातील भोसरी पोलिस ठाण्यानेही बाजी मारली आहे. राज्यातील पाच सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांमध्ये भोसरी पोलिस ठाण्याने चौथा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे नाव उंचावले आहे.
 
कायदा व सुव्यवस्था गुन्हे प्रतिबंध दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी पोलिस ठाण्यांची निवड प्रक्रिया घेण्यात येते. देशपातळीवर १० सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता. यासाठी राज्यातील पोलिस ठाण्यांची निवड देशपातळीवर करण्याच्या उद्देशाने ही निवड केली. यामध्ये राज्यातील पाच पोलिस ठाण्यांची निवड करण्यासाठी समित्यांची निवड केली होती. समितीच्या अहवालानुसार राज्यातील पाच सर्वोत्कृष्ट ठाण्यांची निवड झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलिस ठाणे, नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलिस ठाणे, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विरगाव पोलिस ठाणे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील भोसरी पोलिस ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ पोलिस ठाण्याची निवड झाली आहे.
 
..या अधिकाऱ्यांचे विशेष प्रयत्न
भोसरी पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्याचा मान मिळण्याकरता पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, तत्कालीन सह आयुक्त संजय शिंदे, तत्कालीन अपर आयुक्त रामनाथ पोकळे, भोसरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. 

पोलिसांना प्रोत्साहन
पोलिस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी, गुणवत्ता वाढवणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याबाबत या कार्यमूल्यांकनातून पोलिसांना प्रोत्साहन दिले जाते. गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्यांचा तपास कायदा - सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने यातून पोलिसांना प्रेरणा मिळण्यास मदत होते. 

संवेदनशील ते सर्वोत्कृष्ट पाेलिस ठाणे
पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासनासाठी भोसरी पोलिस ठाणे हे ‘हेवी’ पोलिस ठाणे आहे. तसेच संवेदनशील पोलिस ठाणे म्हणूनही या पोलिस ठाण्याची ओळख आहे. त्यामुळे संवेदनशील ते सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून राज्यात नावलौकिक मिळवणाऱ्या भोसरी पोलिस ठाण्याची देशपातळीवरील दहा सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांमध्ये निवड होणार का, याकडे आता लक्ष लागून आहे.
 

भोसरी पोलिस ठाण्याची निवड होणे ही अभिमानास्पद बाब आहे. तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या कामाचा हा सन्मान आहे. आणखी चांगले काम करण्यास यातून प्रेरणा मिळाली आहे. 
- भास्कर जाधव, पोलिस उपअधीक्षक तथा तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी  

या सर्वोत्कृष्ट सन्मानामुळे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा बहुमान वाढला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा सन्मान खूप मोलाचा ठरणार आहे.   - विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Web Title: Bhosari Police Station was declared 'best'; Five police stations in the state were selected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.