क्रिकेट खेळण्यास मनाई, कुटुंबाला बॅटने मारहाण; खेड तालुक्यातील भांबोली येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 21:07 IST2024-12-26T21:06:51+5:302024-12-26T21:07:13+5:30
मारहाणीत फिर्यादी यांच्या पाठीस व डाव्या हाताच्या कोपराला फॅक्चर झाले.

क्रिकेट खेळण्यास मनाई, कुटुंबाला बॅटने मारहाण; खेड तालुक्यातील भांबोली येथील घटना
पिंपरी : क्रिकेट खेळण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका कुटुंबास बॅटने मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. २४) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील भांबोली गावात घडली. याबाबत ३५ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. २५) महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एकनाथ वसंत मेंगळे, मनोहर शिवराम मेंगळे, अनिल बबन मेंगळे आणि बबन आप्पा मेंगळे (सर्व रा. मु. पो. भांबोली, ता. खेड, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास संशयित हे फिर्यादी महिलेच्या घराजवळ क्रिकेट खेळत होते. त्यावेळी फिर्यादी महिला या सामाईक जमिनीमध्ये जनावरांचे शेण गोळा करून जळणासाठी गोवऱ्या घालत होत्या. शेजारीच फिर्यादी यांच्या वस्तीवरील मुले क्रिकेट खेळताना चेंडू फिर्यादी यांच्या दिशेने जोरात आला. फिर्यादी यांचे सासरे शांताराम मेंगळे यांनी खेळणाऱ्या मुलांना चेंडू इकडे आम्हाला लागेल. तुम्ही इकडे चेंडू मारू नका, असे सांगितले. या कारणावरुन खेळणाऱ्यापैकी फिर्यादी यांचे चुलत दीर यांनी संगनमत करून तुम्ही आम्हाला खेळू देत नाही.
तुमच्या गवऱ्याच पेटवून देतो, असे म्हणत फिर्यादी व सासरे शांताराम मेंगळे यांना शिवीगाळ करून हातातील बॅटने व बबन आप्पा मेंगळे यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संशयित आरोपींनी सासरे शांताराम मेंगळे, पती संजय मेंगळे, सासू बारकाबाई मेंगळे यांना मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या पाठीस व डाव्या हाताच्या कोपराला फॅक्चर झाले. तसेच सासरे, सासू व पती यांना पाठीस, कमरेस, हातास व डोक्यास मुका मार लागला.