अश्लील शिव्यांच्या वापरावर मनपा, खासगी शाळेत बंदी; शिव्यामुक्त समाज अभियानाची अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:21 IST2024-12-24T11:21:02+5:302024-12-24T11:21:52+5:30
आई-बहिणीवरून स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा व अश्लील शिव्यांचा वापर सर्रासपणे केला जातोय

अश्लील शिव्यांच्या वापरावर मनपा, खासगी शाळेत बंदी; शिव्यामुक्त समाज अभियानाची अंमलबजावणी
पिंपरी : शाळांमध्ये अनेक विद्यार्थी शिव्या देतात. यामुळे आई-बहिणीचा, स्त्रीत्वाचा अपमान होतो. अशा अश्लील शिव्यांच्या वापरास पिंपरी-चिंचवड महापालिका व खासगी शाळांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. तसेच शिव्यामुक्त समाजासाठी शपथ घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. ही मोहीम शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे.
राज्यात एकीकडे मातृत्व दिन, रक्षाबंधन, भाऊबीज, महिला दिन साजरा केला जातो, तर दुसरीकडे आई-बहिणीवरून स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा व अश्लील शिव्यांचा वापर सर्रासपणे केला जातो. यामुळे सामाजिक, नैतिक मूल्ये पायदळी तुडवली जातात. शिवी देणे हे समाजविघातक आहे. जातिवाचक शिवीगाळ हा कायद्याने गुन्हा ठरतो. स्त्रीवाचक शिवीगाळदेखील गुन्हा आहे. महापालिका शाळांमध्ये स्त्री- पुरुष समानतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्याला ‘समानतेच्या गोष्टी शिकवून आई-बहिणीचा सन्मान’ करण्यास पुढाकार घेतला जाणार आहे. शाळांमधून शिव्या न देण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे सतत स्त्रियांबद्दल असभ्य, अश्लील शब्द वापरण्यावर मनपा व खासगी शाळांमध्ये बंदी आणली आहे.
पालिका शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र
शहरात महापालिका शाळांमध्ये कष्टकरी, मजूर, कामगार वर्गातील मुले अधिक प्रमाणात शिक्षण घेतात. माध्यमिकचे काही विद्यार्थी तर काम करून शिकतात. सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम या विद्यार्थ्यांवर होतो. त्यामुळे हे विद्यार्थी शाळेत भीडभाड न ठेवता शिव्या देत असत. मात्र, शासनाच्या वतीने शिव्यामुक्त समाज अभियान हा उपक्रम राबविला जाणार असून, महापालिका व खासगी शाळेत शिव्यांना बंदी घातली गेली आहे. त्याबाबत मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाने पत्र दिले आहेत.
महापालिकेच्या व खासगी शाळांमधील सर्व मुख्याध्यापकांना शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार पत्र पाठविले आहे. त्यानुसार, आई-बहिणीचा, स्त्रीत्वाचा अपमान होईल अशा अश्लील शिव्यांच्या वापरास बंदी घातली आहे. विद्यार्थ्यांनी शपथ घेत त्यांच्यामध्ये स्त्रीत्वाच्या सन्मानाची, समृद्ध संस्कृतीची व भारतीय संविधानाच्या तरतुदीचे पालन करण्याची भावना जागृत करण्यात येणार आहे. या मोहिमेला शहरात सुरुवात करण्यात आली आहे. - संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, प्राथमिक, शिक्षण विभाग, महापालिका.