Talawade Accident: सोलापूरहून देहूत पालखीला आलेल्या वारकऱ्याचा क्रेनखाली येऊन मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: June 18, 2025 16:20 IST2025-06-18T16:13:17+5:302025-06-18T16:20:39+5:30
Warkari Accident: देहू वरून आळंदीला पायी चालले होते. ते तळवडे येथील शेलार वस्ती जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली.

Talawade Accident: सोलापूरहून देहूत पालखीला आलेल्या वारकऱ्याचा क्रेनखाली येऊन मृत्यू
चिखली : देहू-आळंदी रस्त्यावर चिखली येथील शेलारवस्ती परिसरात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास क्रेनखाली येऊन जखमी झालेल्या वारकऱ्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. नारायण राणबा गोरवे (वय ६२, रा. आहेरगाव, ता. माढा, जिल्हा सोलापूर) असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी क्रेनचालकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान झाल्यानंतर वारकरी नारायण गोरवे देहूहून आळंदीला पायी निघाले होते. चालत असताना चिखली येथे अचानक क्रेनचा धक्का बसून चाकाखाली पडले. त्यांचे दोन्ही हात, पाय निकामी झाले. अपघातस्थळी रुग्णवाहिकेची तत्काळ मदत न मिळाल्याने गोरवे यांना खासगी रिक्षाने रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. रस्त्यात मध्ये रुग्णवाहिका मिळाल्याने त्यांना तिच्यातून पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आले; परंतु, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नारायण गोरवे पंधरा वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करीत होते. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानासाठी ते देहूला गेले होते. त्यानंतर देहूकडून आळंदीकडे पायी जाताना चिखली येथे हा अपघात झाला.
देहू-आळंदी रस्त्यावर एकेरी वाहतूक
चिखली येथे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त दौरा होता. दौऱ्यादरम्यान चिखली परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. दौऱ्यासाठी शेलारवस्ती परिसरातील देहू-आळंदी रस्त्यावर एकेरी वाहतूक केली होती. यादरम्यान क्रेनच्या अपघातात वारकरी नारायण गोरवे जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.