Ashadhi Wari 2025: अंगावर मुसळधार पावसाच्या सरी झेलत भाविकांची चिंचोलीत विसावास्थळी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:30 IST2025-06-20T16:28:58+5:302025-06-20T16:30:20+5:30

तुकोबांच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी : दिंड्यांना फराळाचे वाटप; पावसामुळे पाणी साचले, वारकऱ्यांसह भाविकांचे हाल, वीरस्थळ चौकात देहूरोड कॅन्टोन्मेंट, झेंडेमळा येथे ग्रामस्थ, सीओडी डेपोकडून वारकऱ्यांचे स्वागत, चिखल तुडवत प्रवास सुरू

Ashadhi Wari 2025 Pools of water accumulated at the site of the first Abhang Aarti | Ashadhi Wari 2025: अंगावर मुसळधार पावसाच्या सरी झेलत भाविकांची चिंचोलीत विसावास्थळी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी

Ashadhi Wari 2025: अंगावर मुसळधार पावसाच्या सरी झेलत भाविकांची चिंचोलीत विसावास्थळी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी

- देवराम भेगडे
 
पुणे
किवळे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दुपारी पावणेदोनला विश्रांतीला चिंचोलीत विसावला. शनिमंदिरासमोर पालखी रथावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. लाखो वारकरी चिंचोलीत थांबले असताना भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मात्र गुरुवारी पहाटेपासून पडत असलेल्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता.

पाणी साचल्याने वारकऱ्यांचे दुपारच्या भोजनाचे हाल झाले.देहूरोडला महामार्गावरील वीरस्थळ चौकात कॅन्टोन्मेंटकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून दिंड्यांना फराळाचे वाटप  करण्यात आले. मुसळधार पाऊस अंगावर झेलत वारकरी मोठ्या आनंदात संतांचे अभंग गात चालले होते.

कॅन्टोन्मेंट हद्दीत झेंडेमळा येथे ग्रामस्थांनी, सीओडी डेपोच्या वतीने अधिकारी तसेच कर्मचारी संघटनांनी स्वागत केले. पालखी येण्यापूर्वी पादुका मंदिर परिसरात चिंचोली, किन्हई, कान्हेवाडी, किवळे, विकासनगर, रावेत, गहुंजे आदी गावांतील भाविक भरपावसात दर्शनासाठी थांबलेले होते.

मुख्य मंदिरासमोर पालखीरथ आल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांच्याहस्ते अभंग व आरती झाली. यावेळी नंदकुमार काळोखे, बाळासाहेब जाधव, शीतल हगवणे उपस्थित होते. देवस्थान समितीच्या वतीने रमेश जाधव, दत्तात्रय लांडगे, गोविंद भेगडे यांच्याहस्ते दिंडी चालकांचा व विणेकऱ्यांचा उपरणे व श्रीफळ देऊन सत्कार केला.

कॅन्टोन्मेंटच्या वतीने फराळ वाटप, आरोग्य सुविधा

देहूरोड येथील संत तुकाराम महाराज स्वागत प्रवेशद्वार येथे पालखी रथावर तुषार तरस, तरस परिवार व राजा शिवछत्रपती मराठा सोसायटीच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. कॅन्टोनमेंट बोर्डाचे सदस्य अॅड. कैलास पानसरे, माजी उपाध्यक्ष मदन सोनीगरा, रघुवीर शेलार यांनी स्वागत केले.
२ बोर्डाच्या वतीने दिंड्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. कॅन्टोन्मेंट रुग्णालयाच्या वतीने दिवसभर सुमारे दोन हजार वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. तपासणी करून व औषधे देण्यात आली. काहींच्या पायांची मालिश करण्यात आली.

वीजपुरवठा युद्धपातळीवर करण्यात आला सुरळीत

चिंचोली परिसरात बुधवारी सायंकाळनंतर वीजपुरवठा खंडित झाला होता. वरिष्ठ अभियंता संतोष झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या अर्ध्या तासात युद्धपातळीवर दुरुस्ती करून ग्रामस्थांची गैरसोय दूर केली.

हातावर पत्रावळी घेऊन वारकऱ्यांचे भोजन

पालखी विसावा ठिकाण चिखलमय झाले असतानाही वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. पावसामुळे ते हातावर पत्रावळी घेऊन भोजन करीत होते. देहूरोडकडे जाणारा रस्ता वारकऱ्यांनी व्यापला होता. 

Web Title: Ashadhi Wari 2025 Pools of water accumulated at the site of the first Abhang Aarti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.