Pune Crime| पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून; पतीचीही गळफास घेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 21:19 IST2022-09-21T21:12:22+5:302022-09-21T21:19:08+5:30
मोशीमधील धक्कादायक घटना...

Pune Crime| पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून; पतीचीही गळफास घेत आत्महत्या
पिंपरी : घरगुती वादातून पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर डोक्यात पाटा घालून खून केला. त्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गंधर्वनगरी, मोशी मंगळवारी (दि. २१) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शांताबाई शिवराय ऐळवे (वय ५२) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. शिवराय तुकाराम ऐळवे (वय ६०, रा. गंधर्वनगरी, मोशी ) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराय हे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करीत होते. शिवराय आणि शांताबाई यांच्यात नेहमी घरगुती कारणांवरून वाद होत असत. शिवराय हे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करीत होते. बुधवारी सकाळी त्यांचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला. त्यावेळी शिवराय आणि शांताबाई यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादातून शिवराय याने शांताबाई यांचा खून केला. त्यानंतर शिवराय याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शांताबाई यांचा गळा दोरीने आवळून डोक्यात पाटा घातला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, शिवराय यांची मुलगी आईवडिलांना भेटण्यासाठी आली. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे मुलीने तिच्या भावाला फोन केला. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास मुलगा घरी आला. त्यावेळी घर आतून बंद होते. मुलाने बराच वेळ दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून आत पाहिले असता शिवराय आणि शांताबाई हे मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.