मैत्रिणीला भेटायला आलेल्या तरुणावर नातेवाईकांनी केला धारदार शस्त्राने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:56 IST2025-11-14T15:56:02+5:302025-11-14T15:56:45+5:30
ज्ञानेश्वर रात्री त्यांच्या मैत्रिणीला भेटायला आले असता, हे तिच्या नातेवाईक अल्पवयीन मुलाने पाहिले. त्यानंतर तो मुलगा त्याच्या मित्रांना घेऊन ज्ञानेश्वर यांना मारहाण करण्यासाठी बाणेर येथील त्यांच्या घरी गेला.

मैत्रिणीला भेटायला आलेल्या तरुणावर नातेवाईकांनी केला धारदार शस्त्राने हल्ला
पिंपरी : मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणावर अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. ११) रात्री दहाच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर त्रंबक चोरघडे (वय ३१, रा. बाणेर बालेवाडी फाटा, पुणे) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बलभीम शिंदे (५२, रा. पिंपळे निलख), एक अल्पवयीन मुलगा आणि एका अनोळखी तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर रात्री त्यांच्या मैत्रिणीला भेटायला आले असता, हे तिच्या नातेवाईक अल्पवयीन मुलाने पाहिले. त्यानंतर तो मुलगा त्याच्या मित्रांना घेऊन ज्ञानेश्वर यांना मारहाण करण्यासाठी बाणेर येथील त्यांच्या घरी गेला. याबद्दल विचारणा करण्यासाठी ज्ञानेश्वर पिंपळे निलख येथे गेले असता, अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि अनोळखी तरुणाने मिळून ज्ञानेश्वर यांना लाथाबुक्क्यांनी तसेच धारदार शस्त्राने डोक्यात, पाठीवर आणि हातावर वार करून जखमी केले.