निगडीत पीएमपीएमएल इलेक्ट्रिकल बसला अचानक आग; प्रवाशांचा थरकाप, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्वजण सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:39 IST2025-10-10T16:38:44+5:302025-10-10T16:39:22+5:30
चालकाने प्रसंगावधान ओळखून बसचे दरवाजे उघडले प्रवाशांनी तत्परतेने बस मधुन बाहेर पडत आपले जीव वाचवले

निगडीत पीएमपीएमएल इलेक्ट्रिकल बसला अचानक आग; प्रवाशांचा थरकाप, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्वजण सुरक्षित
निगडी: मधुकर पावळे उड्डाणंपुल परिसरात दि.१० शुक्रवार रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिकल बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, 303 क्रमांकाची निगडी-आकुर्डी शटल इलेक्ट्रिकल बस ही मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळून आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जात असताना अचानक बसच्या मागील भागातून धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीचे लोट दिसू लागले. बसमध्ये प्रवासी असल्याने क्षणभर गोंधळ उडाला. प्रवाशांनी तत्परतेने खिडक्यांच्या काचा फोडून बस मधील झालेला धुर बाहेर काढला. चालकाने प्रसंगावधान ओळखून बसचे दरवाजे उघडले प्रवाशांनी तत्परतेने बस मधुन बाहेर पडत आपले जीव वाचवले. घटनेची माहिती मिळताच निगडी अग्निशमन दलाचे जवान आणि निगडी पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवून मोठा अनर्थ टाळला.
घटनेनंतर बसच्या परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलीसांनी परिसर बंद करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे स्थानिक प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, बसच्या इलेक्ट्रिकल सिस्टममधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अचूक कारण पीएमपीएमएल प्रशासनाच्या तपासानंतर समोर येईल.