मित्राचे कर्ज, उसने पैसे मिळवून देणाऱ्यानेच उचलले टोकाचे पाऊल
By नारायण बडगुजर | Updated: April 8, 2024 17:59 IST2024-04-08T17:27:47+5:302024-04-08T17:59:05+5:30
पैसे देणाऱ्या मित्रासोबत भांडण करून त्याला मानसिक व आर्थिक त्रास दिला

मित्राचे कर्ज, उसने पैसे मिळवून देणाऱ्यानेच उचलले टोकाचे पाऊल
पिंपरी : मित्राला व्यवसायासाठी लोकांकडून उसने आणि व्याजाने पैसे घेऊन दिले. मात्र मित्राने लोकांना ते वेळेवर परत केले नाहीत. तसेच पैसे देणाऱ्या मित्रासोबत भांडण करून त्याला मानसिक व आर्थिक त्रास दिला. यामुळे उसने पैसे मिळवून देणाऱ्या मित्राने गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेवाडी येथील तापकीनगर येथे शुक्रवारी (दि. ५) सकाळी ही घटना घडली.
दौलतराम भानुदास वाघ (रा. काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या मित्राचे नाव आहे. दौलतराम यांच्या पत्नी ललीता दौलतराम वाघ (५०, रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात रविवारी (दि. ७) फिर्याद दिली. संदीप भिकचंद बागमार (४५, रा. थेरगाव) याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलतराम आणि संदीप हे मागील सात वर्षांपासून मित्र होते. दौलतराम यांनी संदीप याला व्यवसायासाठी अनेक लोकांकडून उसने आणि व्याजाने पैसे घेऊन दिले. मात्र संदीप याने ते पैसे दौलतराम यांना वेळेवर परत दिले नाहीत. दरम्यान, दौलतराम यांनी ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, त्यांनी पैशांसाठी तगादा लावला.
लोकांच्या तगाद्यानंतर दौलतराम यांनी संदीप याच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, संदीप याने दौलतराम यांच्यासोबत भांडण करून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास दिला. त्यातून दौलतराम यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यवंशी तपास करीत आहेत.