पिंपरी-चिंचवडमध्ये महसूल विभागामार्फत धान्याच्या २२ हजार किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 07:29 PM2020-04-20T19:29:04+5:302020-04-20T19:33:40+5:30

उद्योगनगरी असल्याने शहरात विविध राज्यांतील कामगार व मजूर मोठ्या संख्येने

22000 grain kits distribute in the Pimpri-Chinchwad through revenue department | पिंपरी-चिंचवडमध्ये महसूल विभागामार्फत धान्याच्या २२ हजार किटचे वाटप

पिंपरी-चिंचवडमध्ये महसूल विभागामार्फत धान्याच्या २२ हजार किटचे वाटप

Next
ठळक मुद्देशहरात सहा कम्युनिटी किचन : गरजूंना दररोज जेवणाचे सहा हजार पॅकेटपिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयांतर्गत पिंपरी व भोसरी असे दोन मंडल परिक्षेत्र सामाजिक बांधिलकी म्हणून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुष्ठरुग्णांना धान्य उपलब्ध

पिंपरी : लॉकडाऊन असल्याने शहरता अडकलेल्या परप्रांतीय तसेच परराज्यातील कामगारांना व मजुरांना महसूल विभागातर्फे धान्याचे किट वाटप करण्यात येत आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १० हजार तर दुसऱ्या टप्प्यात सोमवारपर्यंत १२ हजार किटचे गरजूंना वाटप करण्यात आले. तसेच शहरात सहा कम्युनिटी किचन तयार करण्यात आले असून, त्या माध्यमातून सहा हजार गरजूंना जेवणाचे पॅकेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडच्या अपर तहसीलदार कार्यालयाकडून शहरात अडकलेल्या २२ हजार परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील गरजूंपर्यंत मदत पोहचविण्यात येत आहे. अपर तहसीलदार गीता गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.

उद्योगनगरी असल्याने शहरात विविध राज्यांतील कामगार व मजूर मोठ्या संख्येने आहेत. यातील गरजू व अडचणीत असलेल्या कामगारांनी त्यांच्या गावाकडील आप्तेष्टांशी व संबंधितांशी संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे अशा गरजूंना मदत पोहच करता यावी, म्हणून संबंधित राज्यांकडून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या यंत्रणेकडून महाराष्ट्र शासनाच्या संबंधित यंत्रणेकडे संपर्क साधण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लेबर सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. संबंधित राज्यातील यंत्रणा या लेबर सेलशी संपर्क साधून पुणे जिल्ह्यात अडकून पडलेल्या त्यांच्या राज्यातील कामगारांबाबत माहिती देत आहे. त्यानुसार लेबर सेल स्थानिक पातळीवरील तहसीलदारांना या कामगारांची नावे, यादी देत आहे. तहसीलदार त्यांच्याकडील मंडल अधिकारी व तलाठी यांच्या माध्यमातून गरजूंना मदत पोहच करीत आहेत. 

पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयांतर्गत पिंपरी व भोसरी असे दोन मंडल परिक्षेत्र आहेत. या दोन्ही परिक्षेत्रांमध्ये सहा कम्युनिटी किचन तयार करण्यात आले आहेत. सामाजिक संस्था व संघटनांची त्यासाठी मदत घेण्यात आली आहे. या संस्था दररोज सरासरी सहा हजार जेवणाचे पॅकेट गरजूंपर्यंत पोहच करीत आहेत. काही गरजू  कम्युनिटी किचनच्या ठिकाणी येऊन जेवणाचे पॅकेट घेऊन जात आहेत. तर काही गरजूंना घरपोहच पॅकेट दिले जात आहे. 

किराणा तसेच धान्य व पीठ याचे किट तयार करण्यात आले आहे. तांदूळ पाच किलो. पीठ पाच किलो, तेल एक किलो, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, दोन साबण, डाळ असे साहित्य या किटमधून देण्यात येत आहे. रावेत येथे किट तयार करण्यात येते. तेथून गरजूंच्या यादीनिहाय त्याचे दररोज वाटप होत आहे. 

...................

माणुसकी म्हणून मदतीचा हात
महसूल विभागाकडून परप्रांतीयांना मदत केली जात आहे. मात्र माणुसकी जपत  दापोडी येथील कुष्ठरुग्णांना देखील महसूल विभागाकडून मदत केली. त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली. कर्तव्य म्हणून गरजूंना मदत केली जात आहे. मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कुष्ठरुग्णांना धान्य उपलब्ध करून दिले. तसेच अनाथआश्रम व वृद्धाश्रमांत देखील धान्य देण्यात आले.

.........................

परजिल्ह्यातील गरजूंनाही मदतीचा हात
परजिल्ह्यातील काही तरुण रोजगारासाठी शहरात आले. मात्र लॉकडाऊनमुळे ते अडकून पडले आहेत. कुटुंब गावाकडे असून ते एकटेचे शहरात आहेत. अशा गरजूंना देखील अपर तहसीलदार कार्यालयाकडून मदतीचा हात देण्यात आला. सामाजिक संस्था, संघटना व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून अशा गरजूंपर्यंत जेवण तसेच धान्य पोहचविण्यात येत आहे.


कर्तव्य म्हणून शासनाच्या निदेर्शानुसार मदत पोहचविण्याचे काम सुरू आहे. मात्र माणूस म्हणून देखील सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम महसूल विभागातील प्रत्येक जण करीत आहे. पहिल्या टप्प्यात याच भावनेने आम्ही मदत केली. काही सामाजिक संस्था, संघटना व दानशूर व्यक्तींमुळे सामाजिक बांधिलकी जपून मदतीचा हात देणे शक्य झाले आहे.
- गीता गायकवाड, अपर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड

Web Title: 22000 grain kits distribute in the Pimpri-Chinchwad through revenue department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.