Travel : एकटं फिरायचंय? टेन्शन सोडा! सोलो ट्रॅव्हलिंगसाठी 'ही' ५ ठिकाणे आहेत सर्वात बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:48 IST2026-01-13T15:39:15+5:302026-01-13T15:48:57+5:30

रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा असेल आणि एकट्याने प्रवास करण्याची इच्छा असेल, तर सोलो ट्रॅव्हल हा एक उत्तम पर्याय आहे.

रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा असेल आणि एकट्याने प्रवास करण्याची इच्छा असेल, तर सोलो ट्रॅव्हल हा एक उत्तम पर्याय आहे. पण, पहिल्यांदाच एकटं फिरायला बाहेर पडताना मनात भीती आणि सुरक्षिततेबाबत शंका असते.

अशा वेळी प्रवासासाठी योग्य जागेची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. जिथे प्रवास सोपा असेल, वातावरण सुरक्षित असेल आणि निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला वेळ देता येईल, अशी भारतातील ५ खास ठिकाणे आम्ही तुमच्यासाठी शोधून काढली आहेत.

निसर्ग आणि संस्कृतीचे दर्शन 'माजुली बेट' : जर तुम्हाला वेगळे काहीतरी पाहायचे असेल, तर ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात वसलेले माजुली बेट नक्की गाठा. हे जगातील सर्वात मोठे नदी बेट असून तेथील आसामी संस्कृती, सतिया नृत्य आणि हिरवाई मन प्रसन्न करते. नौकेतून प्रवास, स्थानिक मठांना भेट आणि ग्रामीण जीवन अनुभवणे तुमच्यासाठी एक अविस्मरणीय सोलो ट्रिप ठरू शकते.

उंच कडे आणि अरबी समुद्र 'वर्कला' : समुद्रकिनाऱ्यावर शांततेच्या शोधात असाल तर 'वर्कला' हा एक उत्तम पर्याय आहे. अरबी समुद्राच्या वर असलेल्या उंच कड्यांवर वसलेले हे शहर एक वेगळाच अनुभव देते. क्लिफवरील कॅफेमधून सूर्यास्त पाहणे किंवा योगा शिकणे यासाठी वर्कला प्रसिद्ध आहे. गर्दीपासून दूर असलेल्या या शहरात सोलो ट्रॅव्हलर्सना रिलॅक्स होण्याची पूर्ण संधी मिळते.

इतिहासाच्या पाऊलखुणा 'हम्पी' : युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट असलेले हम्पी म्हणजे इतिहासाचे एक खुले संग्रहालयच आहे. प्राचीन मंदिरे, विशाल पाषाण आणि तुंगभद्रा नदीचे विलोभनीय दृश्य मनाला भुरळ घालते. सोलो ट्रॅव्हलर्स येथे सायकल किंवा बाईकवरून फिरू शकतात. सुरक्षित वातावरण आणि परवडणारी राहण्याची सोय यामुळे हम्पी हे एकट्याने फिरण्यासाठी सुरक्षित मानले जाते.

निवांत समुद्रकिनारे आणि सूर्यास्त 'दक्षिण गोवा' : गोवा म्हणजे फक्त गर्दी आणि नाईटलाईफ नाही. जर तुम्हाला शांतता हवी असेल, तर दक्षिण गोव्यातील पालोलेम आणि अगोंडा बीच सोलो ट्रॅव्हलसाठी उत्तम आहेत. येथे तुम्ही स्कूटर भाड्याने घेऊन फिरू शकता, कॅफेमध्ये बसून नवीन लोकांशी संवाद साधू शकता किंवा समुद्रकिनारी पुस्तक वाचत स्वतःसोबत वेळ घालवू शकता. इथले वातावरण सोलो ट्रॅव्हलर्ससाठी अतिशय फ्रेंडली आहे.

अध्यात्म आणि साहसाचा संगम 'ऋषिकेश ' : हिमालयाच्या कुशीत आणि गंगेच्या काठावर वसलेले ऋषिकेश हे सोलो ट्रॅव्हलर्सचे आवडते ठिकाण आहे. इथले योग, ध्यान आणि आध्यात्मिक वातावरण तुम्हाला स्वतःशी जोडण्याची संधी देते. येथे अनेक सुरक्षित आश्रम आणि योग केंद्रे आहेत, जिथे एकट्याने प्रवास करणारे प्रवासी सहज राहू शकतात. ज्यांना साहसाची आवड आहे, त्यांच्यासाठी रिव्हर राफ्टिंग आणि निसर्गरम्य कॅफेचा आनंद लुटता येईल.