Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:58 IST2025-09-07T16:52:52+5:302025-09-07T16:58:10+5:30
भारतीय अनेक सुंदर देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात, तेही भारतातील पर्यटन स्थळांपेक्षा कमी खर्चात...

जगात असे अनेक सुंदर देश आहेत, जिथे तुम्ही भारतीय पासपोर्टवर व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशांना भेट देण्याचा खर्च भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा की, येथे व्हिसा अर्ज करण्याचा त्रास होणार नाही आणि तुमच्या खिशावर भारही पडणार नाही.
थायलंड: थायलंड भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा प्रदान करते. बँकॉक, पटाया आणि फुकेत ही येथील खरेदी आणि समुद्रकिनारी जीवनासाठी सर्वोत्तम ठिकाणे आहेत आणि त्यांचा खर्चही परवडणारा आहे. या देशात फिरण्यासाठी ५०,००० ते १,००,००० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
इंडोनेशिया: इंडोनेशियातील बाली हे भारतीय प्रवाशांचे आवडते ठिकाण आहे. येथे प्रवेशासाठी ई-व्हिसा खूप सोपा आहे आणि त्याची किंमत इतकी कमी आहे की ती भारतातील गोवा किंवा शिमला सारख्या ठिकाणांपेक्षा स्वस्त असू शकते. ५०,००० ते १.५ लाख रुपये खर्चून हा देश फिरू शकता.
श्रीलंका: श्रीलंका भारतीयांसाठी ई-व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हल देते. येथील कोलंबो, कॅंडी आणि सिगिरिया किल्ल्याला भारतातील पर्यटन स्थळांपेक्षा कमी खर्चात भेट देता येते. यासाठी ३०,००० ते ७०,००० रुपये खर्च येईल.
मॉरिशस: मॉरिशस भारतीय पर्यटकांना व्हिसा ऑन अरायव्हल म्हणजेच तिथे गेल्यावर व्हिसा देते. सुंदर समुद्रकिनारे, निसर्गरम्य ट्रेल्स आणि कॅसिनो नाईट येथे खूप स्वस्त पॅकेजमध्ये मिळू शकतात. ७०,००० ते १.५ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चात हा देश फिरता येतो.
मालदीव: मालदीव हे केवळ चित्रपटांमध्ये दिसणार सुंदर ठिकाण नाही तर, भारतीय पासपोर्टवर व्हिसा फ्री देखील आहे. येथे स्थानिक बेटांवर कमी किमतीत बजेट-फ्रेंडली रिसॉर्ट्स आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेता येतो. येथे फिरण्याचा खर्च ६०,००० ते १,००,००० रुपयांपर्यंत होऊ शकतो.
भूतान: भूतान त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय येथे व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात आणि अतिशय कमी किमतीत सुंदर मठ आणि दऱ्या पाहू शकतात. अवघे ४०,००० ते ५०,००० रुपये खर्च करून हा देश फिरून येता येईल.
नेपाळ: भारताचा शेजारी देश नेपाळ हा भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे. येथे काठमांडू, पोखरा आणि हिमालयीन खोऱ्यांना अतिशय परवडणाऱ्या किंमतीत भेट देता येते. अवघ्या ३०,००० ते ७०,००० रुपयांमध्ये हा देश फिरून येऊ शकता.