Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 20:52 IST2025-11-19T20:45:15+5:302025-11-19T20:52:35+5:30
१८७४ मध्ये, ब्रिटनने या देशाचा ताबा घेतला आणि तेथे एक वसाहत स्थापन केली. या काळात, ब्रिटिशांनी मोठ्या संख्येने भारतीय मजूर आणले आणि त्यांना पाच वर्षांचे करार करण्यास भाग पाडले.

भारतीय लोक अवघ्या जगभरात विखुरलेले आहे. थोडक्यात भारतीय सर्वत्र आहेत. कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये तुम्हाला लक्षणीय भारतीय लोकसंख्या आढळेल. पण,तुम्हाला माहीत आहे का की एक असा देश आहे, ज्याला मिनी इंडिया म्हटले जाते?

हा देश आहे फिजी. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, फिजीच्या लोकसंख्येपैकी ३८ टक्के लोक भारतीय आहेत. म्हणूनच या देशाला 'मिनी इंडिया' म्हणून देखील ओळखले जाते. या देशाचा इतिहास देखील रंजक आहे. विशेष म्हणजे हा इतिहास भारताशी जोडलेला आहे.

फिजी हे दक्षिण प्रशांत महासागरातील मेलानेशियामधील एक बेट राष्ट्र आहे. भारतीय लोक येथे शतकानुशतके राहतात आणि हिंदी ही या बेटाची अधिकृत भाषा आहे. फिजी जंगले, खनिजे आणि जलसंपत्तीने समृद्ध आहे. पॅसिफिक बेटांमध्ये हे सर्वात समृद्ध राष्ट्र मानले जाते. सौंदर्यातही ते अतुलनीय आहे.

भारताप्रमाणेच, फिजीलाही ब्रिटिश राजवटीत त्रास सहन करावा लागला. १८७४मध्ये ब्रिटनने फिजीचा ताबा घेतला आणि तेथे एक वसाहत स्थापन केली. या काळात, ब्रिटिशांनी मोठ्या संख्येने भारतातून मजूर आणले आणि त्यांना पाच वर्षांचे करार करण्यास भाग पाडले.

भारतीय मजूर उसाच्या शेतात काम करण्यासाठी फिजीमध्ये आणले जात असत. ब्रिटिशांनी अशी अट घातली होती की, ते पाच वर्षांनी भारतात परत येऊ शकतात, परंतु बहुतेक कामगार कधीच भारतात परतले नाहीत. १९२० आणि १९३०च्या दशकात, मोठ्या संख्येने भारतीय स्वेच्छेने फिजीमध्ये स्थायिक झाले आणि तिथेच त्यांच्या पुढच्या पिढ्या देखील राहिल्या. तेव्हापासून फिजीला मिनी इंडिया म्हटले जाते.

फिजी द्वीपसमूहात ३२२ बेटे आहेत. त्यापैकी १०६ बेटे लोकवस्तीची आहेत, ज्यामध्ये वानुआ लेवू आणि विटी लेवू ही सर्वात प्रमुख बेटे आहेत, ज्यावर ८७ टक्के लोकसंख्या राहत आहे. बहुतेक बेटे १५० दशलक्ष वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे निर्माण झाली होती. आजही अनेक बेटांवर ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे.

फिजीमध्ये भारतीयांची संख्या जास्त असल्याने, या देशात अनेक मंदिरे आहेत. सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मंदिर म्हणजे नाडी शहरात असलेले श्री शिव सुब्रमण्य हिंदू मंदिर. मोठ्या हिंदू लोकसंख्येमुळे, फिजीमध्ये दिवाळी, होळी आणि रामनवमीसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. तुम्ही या सुंदर देशात तुमच्या सहलीचे नियोजन देखील करू शकता.

















