शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलंच मंदीर, दीड एकरात होतंय साकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 02:01 PM2021-07-05T14:01:53+5:302021-07-05T14:19:33+5:30

शिवक्रांती प्रतिष्ठान यांच्यामार्फत दीड एकर परिसरात या भव्य मंदिराच्या उभारणीचे कार्य गेले दोन वर्षांपासून सुरु आहे. कोविड काळामधील अडचणींवर मात करून शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राज चौधरी व साईनाथ चौधरी या भावंडानी मंदिराचे सुमारे ८०% बांधकाम पूर्णत्वास नेले आहे.

समस्त मराठी जनतेचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणीचे काम भिवंडी येथील मराडेपाडा गावात सुरू आहे. डोळे दिपून जावेत इतके भव्यदिव्य असे छत्रपती शिवरायांचे हे महाराष्ट्रातील पहिलेच मंदिर आहे.

शिवक्रांती प्रतिष्ठान यांच्यामार्फत दीड एकर परिसरात या भव्य मंदिराच्या उभारणीचे कार्य गेले दोन वर्षांपासून सुरु आहे. कोविड काळामधील अडचणींवर मात करून शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राज चौधरी व साईनाथ चौधरी या भावंडानी मंदिराचे सुमारे ८०% बांधकाम पूर्णत्वास नेले आहे.

मराठा जागृती मंच पानिपत, ठाणे जिल्हा यांच्यातर्फे विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने या मंदिराच्या निर्माणकार्याची माहिती घेण्यासाठी दिनांक ४ जुलै २०२१ रोजी स्थळपाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मंदीर परिसरात देशी वृक्षांच्या रोपणाचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडीचे तहसिलदार अधिक पाटील व पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात शिवव्याख्याती सायली प्रमोद भोसले यांनी मांडलेल्या शिवविचारांनी झाली. तदनंतर प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या वृक्षारोपण कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थित सर्व सामाजिक संघटनांच्या स्वयंसेवकांमार्फत मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सुमारे ४० हजार इतका कृतज्ञता निधी विविध सामाजिक संघटना व शिवभक्तांनी तहसीलदार अधिक पाटील यांच्या हस्ते शिवक्रांती प्रतिष्ठानकडे सुपूर्त केला.

शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ चौधरी, उपाध्यक्ष श्रीकांत गायकर इतर सदस्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कारसमारंभ केले.

आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचे भव्यदिव्य मंदिर पाहून अचंबित झालो. शिवक्रांती प्रतिष्ठान व चौधरी बंधूंच्या कार्याची दखल इतिहासात सुवर्णक्षरात नोंदली जाईल यात शंका नाही.

सदर परिसराला शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त करून देण्याबाबत शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे तहसीलदार पाटील यांनी म्हटलं.

शिवरायांनी वतनदार, सुभेदार याना वेळोवेळी लिहिलेल्या उपलब्ध पत्रांमध्ये वृक्षांची अनावश्यक तोड होणार नाही व तसे करणे पर्यावरणास कसे घातक आहे.

याबद्दल केलेल्या सूचना आजच्या काळात अतिशय समर्पक आहेत. हवामान बदलाच्या गहिऱ्या संकटाचा सामना करताना विकासकामांमध्ये कमीत कमी वृक्षतोड होईल याची काळजी समाजातील सर्व घटकांनी घ्यायला हवी, असे पर्यावरण कार्यकर्ता रोहित शिंदे यांनी म्हटले.