"तीन महिने झाले हो... आमचा आमदार होता तो..."; शिवसेना नेते प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघात 'हरवले आहेत'चे बॅनर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 11:33 AM2021-06-16T11:33:30+5:302021-06-16T12:10:51+5:30

pratap saranaik : भाजपने या बॅनरच्या आडून अप्रत्यक्षपणे थेट शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाणे : ठाण्यातील ओवळा माजिवडा या विधानसभा क्षेत्रात रातोरात लागलेल्या बॅनरवरून सध्या चांगलीच खंमग चर्चा रंगू लागली आहे. या बॅनरवर ओवळा-माजिवडाचे आमदार हरवले, आपण त्यांना पाहिले का? असा आशय दिसून येत आहे. (फोटोः विशाल हळदे)

हे बॅनर लागले कसे, कोणी लावले अशी चर्चा सुरू असली, तरी भाजपच्या माध्यमातूनच हे बॅनर लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भाजपने या बॅनरच्या आडून अप्रत्यक्षपणे थेट शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागील तीन महिन्यांपासून या विधानसभा मतदार संघाचे आमदार गायब आहेत, असा उल्लेख काही बॅनरवर करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपचा रोख शिवसेना आमदार सरनाईक यांच्यावरच आहे, हे स्पष्ट होते. (फोटोः विशाल हळदे)

विशेष म्हणजे मागील दोन महिन्यापूर्वी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदार संघाचे आमदार हरविले म्हणून पोलीस आयुक्तांकडे देखील तक्रार केल्याची माहिती आहे. त्यांनी या तक्रारीत आमदाराला शोधावे अशी मागणीही केली आहे.

मागील तीन महिन्यापूर्वी सरनाईक यांचे नाव मनी-लॉंड्रीग प्रकरणात आल्याने देखील खळबळ उडाली आहे. तसेच, त्यांच्या ठाण्यातील घर, ऑफीस आणि लोणावळा येथील प्रॉपट्रीवर देखील ईडीने छापा टाकला आहे.

त्यामुळे ते मागील तीन महिन्यापासून चर्चेत आहेत. ओवळा-माजिवडा वाऱ्यावर, आमदार कागदावर! असेही बॅनरवर लिहिले आहे. तसेच, पावसाळा सुरू झाला असून येथील मतदार आपल्या आमदाराची वाट पाहत आहेत, ते आपल्या समस्या सोडवितील अशी अपेक्षा आहे. (फोटोः विशाल हळदे)

परंतु मागील तीन महिने या आमदाराचे तोंडच पाहिले नसल्याची चर्चा देखील आता खंमगपणे या मतदार संघात रंगताना दिसत आहे. त्यामुळे या बॅनरबाजीच्या आडून मारलेल्या टोल्याला आता शिवसेना उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.