तुम्ही घरात CCTV लावण्याचा विचार करताय? ‘या’ १० गोष्टी कायम लक्षात ठेवा; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 05:53 PM2021-08-18T17:53:33+5:302021-08-18T17:58:00+5:30

तुम्ही घरासाठी CCTV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

गेल्या काही कालावधीत CCTV चे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. मोठ्या रस्त्यापासून ते गल्लीतील एका छोट्याशा दुकानातही सिक्योरिटी कॅमेरा लावल्याचे पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर घरांमध्ये सिक्योरिटी कॅमेरा लावण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

कमी किंमत, अ‍ॅप सपोर्ट, वापरण्यास सोपे अशा अनेक गोष्टींमुळे सिक्योरिटी कॅमेराची लोकप्रियता वाढली आहे. बाजारात अनेक वेगवेगळे सिक्योरिटी कॅमेरे असल्याने कोणता कॅमेरा खरेदी करावा यात गोंधळ निर्माण होतो. कॅमेरा खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे तुम्ही कोणत्या कारणासाठी खरेदी करत आहात.

अनेक कॅमेरे वेगवेगळ्या फीचर्ससह येतात. त्यामुळे सिक्योरिटी कॅमेरा खरेदी करताना सर्व बेसिक फीचर्स, आवश्यकता तपासूनच खरेदी करायला हवा. तुम्ही घरासाठी सिक्योरिटी कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

घरासाठी सिक्योरिटी कॅमेरा खरेदी करताना सर्वात प्रथम तुमच्या मनात याचे इंस्टॉलेशन कसे असेल असा प्रश्न येत असेल. सध्या बाजारत येणारे कॅमेरे हे इंस्टॉल करण्यास खूपच सोपे व प्लग-इन अ‍ॅडाप्टरसह येतात. त्यामुळे खरेदी करण्याआधी कॅमेरा कोठे बसवणार हे ठरवावे. घरासाठी सिक्योरिटी कॅमेरा खरेदी करताना कमीत कमी २० ते २५ मीटर रेंजसह येणारा कॅमेरा खरेदी करावा.

अनेक सिक्योरिटी कॅमेरे हे ७२०p आणि १०८०p सपोर्टसह येतात. बाजारात उपलब्ध असलेले काही कॅमेरा २के आणि ४के रिझॉल्यूशनसह देखील येतात. जेवढे अधिक रिझॉल्यूशन असेल तेवढे फुटेज स्पष्ट दिसेल. मात्र, जेवढे जास्त रिझॉल्यूशन असेल तेवढी अधिक क्लिप्सची साइज असेल.

असे अनेक अ‍ॅप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही घरात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवू शकता. त्यामुळे सिक्योरिटी कॅमेरा खरेदी करताना अ‍ॅप सपोर्टसह येणाराच खरेदी करा. जेणेकरून तुम्ही मोबाइलशी कॅमेरा कनेक्ट करू शकाल. याशिवाय तुम्ही अ‍ॅप वापरणे सोपे आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी प्ले स्टोरवर रेटिंगद्वारे तपासू शकता.

होम सिक्योरिटी कॅमेरा कोणताही अनोळखी आवाज अथवा हालचाल दिसल्यास त्वरित यूजर्सला अलर्ट करायला हवे. लिंक अ‍ॅप अथवा अलार्म स्वरूपात अलर्ट केले जावे. बाजारात मोशन डिटेक्शन सेंसर आणि ऑडिओ डिटेक्शन सेंसरसह येणारे अनेक कॅमेरे उपलब्ध आहेत. त्यामुळे सिक्योरिटी कॅमेरा खरेदी करताना या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या.

होम सिक्योरिटी कॅमेऱ्यामध्ये नाइट व्हिजन सपोर्ट असायलाच हवा. Infra-Red LEDs सह येणारा सिक्योरिटी कॅमेरा खरेदी करा. तसेच अनेक सिक्योरिटी कॅमेरे हे क्लाउड स्टोरेज सपोर्टसह येतात. याशिवाय काही कॅमेरे हे मायक्रोएसडी कार्ड आणि एक्सटर्नल हार्ड ड्राइव्ह सपोर्टसह देखील येतात.

होम सिक्योरिटी कॅमेरा किती दिवस टिकेल हे तपासणे गरजेचे आहे. तुम्ही कॅमेरा कोठे लावता यावर देखील हे अवलंबून असते. याशिवाय वॉटर-प्रूफ व इतर हवामानात देखील टिकेल का हे तपासायला हवे.

तुम्हाला बाजारात वाय-फाय आणि वाय-फायची आवश्यकता नसलेले असे दोन्ही प्रकारचे कॅमेरे आढळतील. सध्या बाजारात येणारे बहुतांश कॅमेरे हे वाय-फाय कनेक्टिव्हिटीसह येतात.

म्हणजेच तुम्हाला कॅमेरा इंटरनेटशी कनेक्ट होईल अशाच ठिकाणी लावावा लागेल. याशिवाय वायर्ड कॅमेरे देखील येतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कंपनीचे डेटा प्रायव्हसीबाबत काय धोरण आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

याशिवाय सेक्युरिटी कॅमेरा उपलब्ध करून देणारी कंपनी फुटेजसाठी एनक्रिप्शन, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची सुविधा देत आहे का ते पाहावे, असे सांगितले जाते.