तुम्हालाही WhatsApp वर +92 कोड नंबरवरून कॉल्स येतात? मग, व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 01:56 PM2022-08-01T13:56:07+5:302022-08-01T14:02:26+5:30

WhatsApp : गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन स्कॅम सुरू आहे.

सायबर गुन्हेगारांकडून व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) माध्यमातून युजर्सना टार्गेट केले जात आहे. स्कॅमर्स व्हॉट्सअ‍ॅपच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन स्कॅम सुरू आहे.

अनेकांना +92 कोड असलेल्या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅपवर कॉल येत आहेत. व्हॉट्सअॅपवरील या इनकमिंग कॉल्सद्वारे युजर्सना लॉटरी किंवा बक्षीस जिंकण्याचे आमिष दाखवले जाते. यामुळे अनेक युजर्स या गोष्टींकडे येतात आणि त्यांचे पर्सनल डिटेल्स आणि इतर माहिती शेअर करतात, ज्यामुळे त्यांचे खूप नुकसान होते.

दरम्यान, +92 हा पाकिस्तानचा कंट्री कोड आहे. भारताचा कंट्री कोड +91 आहे. अशा स्थितीत हे फोन पाकिस्तानातून येत असल्याचे समजते. परंतु, अनेक वेळा असे क्रमांक अक्षरशः उपलब्ध करून दिले जातात, ज्यावर तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एक्सेस करू शकता. त्यामुळे सर्व कॉल्स पाकिस्तानातूनच येत असतील असे नाही.

जर तुम्हाला +92 देश कोड नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल येत असतील, तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जर तुम्हाला +92 कोड असलेल्या नंबरवरून कॉल येत असेल आणि तुम्हाला तो नंबर माहीत नसेल, तर अशा कॉलकडे दुर्लक्ष करा.

याशिवाय त्या नंबरवर रिप्लाय देऊन अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. काहीवेळा स्कॅमर्स त्यांचा डीपी खूप छान दाखवू शकतात. यामुळे अनेक युजर्स त्यांच्या जाळ्यात अडकतात. अशा परिस्थितीत +92 कंट्री कोड नंबरवरून येणाऱ्या अनोळखी कॉलला प्रतिसाद न देण्याचा प्रयत्न करा.

जर तुम्हाला वारंवार कॉल येत असतील तर तुम्ही थेट असा नंबर ब्लॉक करू शकता. अशा स्थितीत तुम्हाला पुन्हा त्या नंबरवरून कॉल किंवा मेसेज येणार नाही. तुम्ही अशा नंबरची तक्रार देखील करू शकता. यासाठी कंपनी फीचर्स देते. जर तुम्ही सायबर फसवणुकीचे बळी असाल तर उशीर न करता सायबर सेलमध्ये तुमची तक्रार नोंदवा.