"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:04 IST2025-07-29T13:59:42+5:302025-07-29T14:04:27+5:30

सध्या प्रत्येक जण AI विषयी चर्चा करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता..हे एक असं तंत्रज्ञान आहे ज्यात मशिन मानवासारखे विचार आणि काम करू शकते. AI तंत्रज्ञान वेगाने प्रत्येक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करत आहे, ज्यामुळे शिक्षणासह अनेक उद्योगात मोठे बदल होत आहेत. Open AI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी शैक्षणिक भविष्यावर चिंता व्यक्त केली आहे.

शिक्षण क्षेत्राबाबत त्यांचे मत आहे की, ज्याप्रकारे AI वेगाने पसरत आहे त्यामुळे शिक्षणाची जुनी पद्धत कदाचितच शिल्लक राहील. इतकेच नाही तर माझा मुलगा पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये जाईल असं मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले. परंतु शिक्षण क्षेत्रात AI चे काही सकारात्मक बदलही त्यांनी दाखवले.

एआय शिकवण्याच्या पद्धतीत मोठे बदल घडवेल. परंतु यामुळे मनुष्याचे महत्त्व संपणार नाही असं सॅम यांनी म्हटले. दिस पास्ट विकेंड या पॉडकास्टमध्ये बोलताना सॅम ऑल्टमॅन यांनी एआयचा शिक्षण आणि नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर भाष्य केले.

मागील काही महिन्यांपासून खूप बदल घडत आहेत. आर्टिफिशिय इंजेलिजेंसमुळे शैक्षणिक क्षेत्रावर भविष्यात खूप परिणाम होतील. १८ वर्षांनी जग पूर्ण बदलून जाईल. ज्याठिकाणी AI ला आपल्यापेक्षा अधिक माहिती असेल. कॉलेज सध्याच्या युवकांची गरज पूर्ण करू शकत नाही त्यामुळे पुढे कॉलेजचं महत्त्व राहणार नाही असं त्यांनी म्हटलं.

ज्याप्रकारे AI च्या कामाची पद्धत आहे त्या हिशोबाने ते कायम विद्यार्थ्यांपेक्षा स्मार्ट राहील. एआय विद्यार्थ्यांमध्ये लर्निंग मेथडही बदलेल. एआय शिकण्याची नवी पद्धत आहे असं सांगत सॅम यांनी कॅलक्युलेटरचं उदाहरण दिले. AI कॅलक्युलेटरसारखे शिक्षणाला आणखी दर्जदार बनवेल असं त्यांनी सांगितले.

एका प्रश्नाला उत्तर देताना सॅम ऑल्टमॅन यांनी माझा मुलगा कॉलेज शिकेल असं वाटत नाही. मी स्वत: बिझनेस सुरू करण्यासाठी २००५ मध्ये शिक्षण सोडले होते. मी प्रतिष्ठित यूनिवर्सिटीज स्टॅनफोर्डमध्ये शिक्षण घेत होतो. AI आल्याने पारंपारिक कॉलेजची गरज कमी होईल असं त्यांनी उत्तर दिले.

आता जी मुले जन्माला येत आहेत ती अशा जगात येतील जिथे AI कायम स्मार्ट असेल. एआय प्रत्येक ठिकाणी आहे त्यामुळे शिक्षणात रट्टा मारून शिकणे आणि परीक्षेत चांगले मार्क्स आणल्याने काही होणार नाही. लोकांनी असं काही शोधून काढले आहे ज्यामुळे मानवी इतिहास बदलून जाईल. वेळीच शिकवण्याची पद्धत बदलेल असं सॅम ऑल्टमॅन यांनी म्हटलं.

या सगळ्यामध्ये तरुण पिढीला एआयशी जुळवून घेणे सोपे जाईल, परंतु जुनी पिढी एआय कसे स्वीकारेल? ही त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी असे घडले आहे की तरुण नवीन तंत्रज्ञान सहजपणे स्वीकारतात तर वृद्धांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांना पारंपारिक शिक्षण आणि जुनी काम करण्याची पद्धत सोडण्यात खूप अडचणी येतील असं त्यांनी सांगितले.

तसेच तंत्रज्ञान ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. एआय असं टूल आहे जे आपल्याला काम करण्याची आणि विचार करण्याची पद्धत पूर्ण बदलून टाकेल. कदाचित येणाऱ्या पिढीला आपलं जीवन खूप साधे वाटेल. जुन्या पिढीतील लोकही आपल्याबाबत असाच विचार करत असतील. १०० वर्षांनी कदाचित भविष्यही बदलेल असं ऑल्टमॅन यांनी म्हटलं.

सॅम ऑल्टमन यांच्या विधानावरून आपण अंदाज लावू शकतो की कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यात आपल्या जीवनावर किती खोलवर परिणाम करू शकते. केवळ एक तंत्रज्ञान नाही तर भविष्य बदलण्याची शक्ती आहे हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. मानवांमध्ये असे काही गुण आहेत जे कोणत्याही तंत्रज्ञानात किंवा यंत्रात आढळू शकत नाहीत, जसं क्रिएटिव्हिटी, सोशल स्किल्स त्यामुळे आपण स्वतःमध्ये हे गुण विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे, जेणेकरून आपण एआय वापरून चांगले भविष्य घडवू शकू.