सावधान! 3 मिस्ड कॉल अन् खात्यातून उडाले लाखो रुपये; सिम स्वॅप स्कॅममध्ये अडकली 'ती'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 11:12 AM2023-10-23T11:12:01+5:302023-10-23T11:18:17+5:30

महिला वकिलाला कोणताही कॉल आला नाही किंवा तिने कोणताही ओटीपी शेअर केला नाही. मात्र तरीही तिच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाले

देशभरात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या घटना रोज समोर येत आहेत. याच दरम्यान दिल्ली हायकोर्टात प्रॅक्टिस करणारी एक महिला वकिलही सायबर गुन्ह्याची बळी ठरली.

महिला वकिलाला कोणताही कॉल आला नाही किंवा तिने कोणताही ओटीपी शेअर केला नाही. मात्र तरीही तिच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाले. पीडितेला तिच्या फोनवर फक्त तीन वेळा मिस्ड कॉल आला आणि हॅकर्सनी तिच्या खात्यातून पैसे गायब केले.

हे संपूर्ण प्रकरण सिम स्वॅपिंगशी संबंधित आहे. याआधीही सिम स्वॅपिंगची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने सांगितले की, वकिलाने आरोपीच्या कोणत्याही फोन कॉलला उत्तर दिलं नाही.

महिलेने कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा ओटीपी शेअर केला नाही, मात्र आरोपी बँकिंग तपशीलांसह तिची सर्व वैयक्तिक माहिती काढण्यात यशस्वी ठरला आणि तिचे पैसे चोरले. महिलेच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाले आहे.

महिलेने त्या व्यक्तीला दुसर्‍या क्रमांकावरून कॉल केला, परंतु तो कुरिअर डिलिव्हरी कॉल असल्याचं सांगण्यात आलं. अधिकाऱ्याने सांगितलं की, "महिलेने तिच्या मित्राने पाठवलेलं काही सामान तिला मिळणार आहे, असा विचार करून घरचा पत्ता दिला होता."

"महिलेने कोणताही बँकिंग तपशील, ओटीपी किंवा पासवर्ड शेअर केलेला नाही. जेव्हा तिने आमच्याशी संपर्क साधला तेव्हा आम्हाला आढळलं की तिच्या संमतीशिवाय अनेक वेळा पैसे डेबिट केले गेले आहेत.''

तपासादरम्यान असे आढळून आले की महिलेला फिशिंग लिंक्स तसेच यूपीआय रजिस्ट्रेशनचे फेक मेसेज देखील आले. महिलेने तिच्या तक्रारीत असंही म्हटलं आहे की तिला एका व्यक्तीकडून कॉल आला ज्याने स्वतःची ओळख IFSO अधिकारी म्हणून केली आणि तिचे बँक स्टेटमेंट मागितले.

सुदैवाने, तिने त्याच्यासोबत कोणतेही तपशील शेअर केले नाहीत. याप्रकरणी सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.