Windows 10 ची 'डेडलाइन' संपली! मायक्रोसॉफ्टकडून आजपासून फ्री सपोर्ट बंद पण सिस्टीम चालू राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 18:57 IST2025-10-14T18:41:18+5:302025-10-14T18:57:49+5:30

मायक्रोसॉफ्ट १४ ऑक्टोबरपासून विंडोज १० वर चालणाऱ्या सर्व उपकरणांना ओव्हर-द-एअर सुरक्षा अपडेट्स देणे थांबवणार आहे.

जर तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरत असाल आणि त्यात मायक्रोसॉफ्टच्या Windows 10 प्लॅटफॉर्मवर काम करत असाल, तर आजची, म्हणजेच १४ ऑक्टोबर २०२५ ही तारीख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, या दिवसापासून मायक्रोसॉफ्टने Windows 10 साठी मोफत सपोर्ट पूर्णपणे बंद केला आहे.

याचा अर्थ असा की, यापुढे तुमच्या Windows 10 सिस्टीमची सुरक्षा पूर्वीसारखी मजबूत राहणार नाही. मायक्रोसॉफ्टकडून कोणतेही नवीन सुरक्षा पॅच जारी केले जाणार नाहीत. सुरक्षा पॅच हे व्हायरस आणि सायबर हल्ल्यांपासून सिस्टीमचे संरक्षण करतात. हे पॅच न मिळाल्यास, तुमच्या सिस्टीमवर सायबर हल्ला आणि व्हायरसचा धोका लक्षणीय वाढणार आहे.

सपोर्ट बंद झाल्यानंतरही तुमचे लॅपटॉप आणि कॉम्प्युटर चालू राहतील, परंतु त्यांची सुरक्षा कमकुवत होईल. मायक्रोसॉफ्टने Windows 10 साठी मायक्रोसॉफ्ट डिफेंडर आणि एक्सीडेंट सिक्युरिटी अपडेट्स हे दोन मुख्य पर्याय दिले आहेत.

मायक्रोसॉफ्ट डिफेंडर हे मायक्रोसॉफ्टचे अँटीव्हायरस सिस्टीम आहे. जे युजर्स कमी प्रमाणात सिस्टीमचा वापर करतात, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. या अँटीव्हायरसला ऑक्टोबर २०२८ पर्यंत सुरक्षा अपडेट मिळत राहतील.

एक्सीडेंट सिक्युरिटी अपडेट्स प्रोग्राम हा एक पेड प्रोग्राम आहे, जो १५ ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल. या प्रोग्राम अंतर्गत युजर्सना मोफत विंडोज बॅकअप घेता येईल. ३० डॉलर (सुमारे २,६५० रुपये) शुल्क भरून एका वर्षासाठी अतिरिक्त सुरक्षा कवच मिळू शकेल.

जे युजर्स सिस्टीमचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात किंवा व्यवसायासाठी Windows 10 चा उपयोग करतात, त्यांच्यासाठी Windows 11 वर शिफ्ट होणे हा सर्वात सुरक्षित आणि योग्य उपाय असेल.

जवळपास एक दशक Windows 10 लाँच करण्यात आले होते, ज्याचा सपोर्ट आता अधिकृतपणे बंद करण्यात आला आहे.