शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:20 IST2025-08-27T18:15:55+5:302025-08-27T18:20:07+5:30

जगातील सर्वात दिग्गज टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मेटा कंपनीचे संचालक मार्क झुकेरबर्ग आणि त्यांचे शेजारी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. अनेक तक्रारी आहेत, परंतु झुकेरबर्ग ते वाद सोडवण्यासाठी भेटवस्तूंचा अवलंब करतात.
आता मेटा सीईओ झुकेरबर्ग पालो अल्टो परिसरातील त्यांच्या शेजाऱ्यांना नॉइज कॅन्सलिंग हेडफोन देत असल्याचा दावा करणारी बातमी समोर आली आहे. झुकेरबर्ग यांच्या घरात सुरू असलेल्या बांधकामामुळे शेजारील नागरिक त्रस्त आहे.
या तक्रारी आल्यानंतर झुकेरबर्ग त्यांना हेडफोन देत आहेत. गेल्या १४ वर्षांत झुकेरबर्गने एजवुड ड्राइव्ह आणि हॅमिल्टन अव्हेन्यूवर ११ घरे खरेदी करण्यासाठी ११० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केल्याचे म्हटले जाते. या घरांच्या नूतनीकरणामुळे खूप आवाज झाला होता.
न्यू यॉर्क टाईम्समधील एका वृत्तानुसार, झुकेरबर्गने खरेदी केलेल्या अनेक घरांचे गेस्ट हाऊस, गार्डन्स आणि अगदी स्विमिंग पूलमध्येही बदल करण्यात आले आहेत. मार्कने त्याच्या मुलांसाठी एक खाजगी शाळा देखील उघडली जी जास्त काळ टिकू शकली नाही.
त्याने त्याच्या कंपाऊंडच्या खाली बांधकाम देखील केले आहे. या सर्व कामांमध्ये होणाऱ्या आवाजामुळे झुकेरबर्गचे शेजारी खूप त्रस्त आहेत. शेजारील लोकांच्या समस्येला तोंड देण्यासाठी झुकेरबर्गने हेडफोन, स्पार्कलिंग वाईन आणि डोनट्स सारख्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. पण यामुळे त्यांना काही फायदा झाला नाही.
झुकेरबर्ग आणि त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये अनेक वाद झाले आहेत. झुकेरबर्गच्या वागणुकीवरून शेजारी खूश नाहीत. बांधकाम कामामुळे रस्ते बंद असल्याने, कचरा साचल्याने आणि आवाजामुळे ते त्रस्त आहेत.
झुकेरबर्ग ज्या भागात राहतो त्या भागातही खूप गस्त घातली जाते आणि त्यामुळे शेजाऱ्यांमध्येही संताप निर्माण होत आहे. बऱ्याचदा त्याबाबत तक्रार केली जाते, ज्याला सोडवण्यासाठी झुकेरबर्गकडून गिफ्ट पाठवले जाते,परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही.
झुकेरबर्गचे शेजारी म्हणतात की हा परिसर पूर्वी खूप शांत होता. झुकेरबर्ग जिथे राहतो तिथे वकील, अधिकारी आणि प्राध्यापक राहत होते. आता या भागात बरीच बांधकामे होत आहेत. हा परिसर खूप गजबजलेला आहे आणि तिथे पार्ट्यांचे केंद्र बनला आहे.
रिपोर्टमध्ये उल्लेख केलेल्या पालो अल्टो परिसरात २०१६ मध्ये झुकेरबर्गची चार घरे पाडून एक नवीन इमारत आणि एक मोठा तळघर बांधण्याची योजना होती, परंतु ती योजना नाकारण्यात आली. असे म्हटले जाते की त्यानंतर बांधकाम लहान लहान टप्प्यात केले जात होते.