बापरे! ऑर्डर केला 1 लाखाचा टीव्ही, बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 12:55 PM2023-10-26T12:55:03+5:302023-10-26T13:04:08+5:30

एक लाखाचा सोनी ब्रँडचा टीव्ही ऑर्डर केला. तो आनंदाचा क्षणही आला आहे, ज्याची ती व्यक्ती आतुरतेने वाट पाहत होती. पण बॉक्स उघडताच जे पाहिलं ते पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला.

ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

अनेकदा मात्र ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहे. तुम्हीही घरी बसून ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान. कारण, सणासुदीच्या काळात यामुळे मोठा फटका बसून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

एका व्यक्तीने मोठ्या स्क्रीनवर वर्ल्ड कपचा आनंद लुटण्यासाठी फ्लिपकार्टवरून एक लाखाचा सोनी ब्रँडचा टीव्ही ऑर्डर केला. तो आनंदाचा क्षणही आला आहे, ज्याची ती व्यक्ती आतुरतेने वाट पाहत होती. पण बॉक्स उघडताच जे पाहिलं ते पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला.

@thetrueindian हँडलवरून आर्यन नावाच्या युजरने फ्लिपकार्टवरून मागवलेल्या वस्तूचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये बॉक्स सोनी टीव्ही ब्रँडचा आहे, परंतु आतमध्ये थॉमसनचा टीव्ही असलेलं पाहायला मिळत आहे.

फ्लिपकार्टला टॅग करत आर्यनने लिहिलं की, "मी 7 ऑक्टोबर रोजी सोनी टीव्हीची ऑर्डर दिली. 10 ऑक्‍टोबर रोजी डिलिव्हरी झाली. पण जेव्हा सोनीवरून आलेल्या व्यक्तीने तो बॉक्स उघडला तेव्हा आम्हा दोघांनाही मोठा धक्का बसला."

आर्यनच्या म्हणण्यानुसार, "बॉक्समधून जो टीव्ही बाहेर काढला ते सोनी कंपनीचा नसून थॉमसन कंपनीचा टीव्ही होता. एवढेच नाही तर रिमोट स्टँडसह इतर सामानही गायब होतं." याच दरम्यान आर्यनने फिल्पकार्टवर एक आरोपही केला आहे.

आर्यनचा आरोप आहे की, टीव्ही रिटर्न रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर तीन आठवड्यांनंतरही फ्लिपकार्टकडून त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. याउलट, फ्लिपकार्टने समस्या सोडवल्याचे सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर टाकून मदतीचे आवाहन केले आहे.

आर्यनची ही पोस्ट आतापर्यंत 21 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. अनेक युजर्सनी त्याला असा सल्ला दिला आहे की त्याने डिलिव्हरीच्या वेळी बॉक्स उघडला पाहिजे होता आणि तपासला हवा होता. त्यावर आर्यनने त्याला हा ऑप्शन दिला नसल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :ऑनलाइनonline