मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 18:31 IST2025-08-25T18:24:39+5:302025-08-25T18:31:11+5:30
मोबाईल हॅक होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आतापर्यंत अनेकांच्या बँक खात्यावरुन कोट्यवधी रुपये लंपास केले आहेत.

महाराष्ट्रात दररोज हजारो सायबर गुन्हांच्या नोंदी होतात. रोज कोट्यवधि रुपये खात्यावरुन चोरले जातात. काही दिवसापूर्वी हिंगोलीतील एका व्यक्तीच्या व्हॉट्सअॅपवर लग्नपत्रिका आली, ती ओपन करताच बँक खात्यावरील २० लाख रुपये उडाले.
अनेकांच्या मोबाइलवर काही मेसेज येतात या माध्यमातून हॅकर आपले मोबाइल क्लोन करतात. आपला मोबाइल हॅक झालाय की नाही हे आपल्याला कळतही नाही.
हॅकर आपला मोबाइल हॅक करुन बँकांच्या खात्याची माहिती घेत असतो. आपल्या खात्यावर पैसे आले की तो लगेच काढून घेतो. पैसे गेल्यानंतरच आपला मोबाइल हॅक झाल्याचे आपल्याला समजते.
जर तुमचा फोन अचानक खूप स्लो झाला असेल, तर हे सामान्य नाही. ज्यावेळी तुम्ही कोणतेही नवीन किंवा जड अॅप इन्स्टॉल केलेले नाही. याशिवाय, फोनचा इंटरनेट डेटा कोणत्याही कारणाशिवाय लवकर संपणे हे देखील हॅकिंगचे संकेत आहे.मालवेअर तुमच्या बॅकग्राउंडला तुमची गोपनीय माहिती चोरत असते.
बॅटरी लवकर संपणे हे देखील एक मोठे लक्षण आहे. हॅकिंग दरम्यान अनेकदा अनेक प्रक्रिया बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, यामुळे बॅटरी खूप लवकर डिस्चार्ज होते.
जर तुमच्या नंबरवरून अज्ञात संदेश किंवा कॉल येत असतील किंवा तुम्हाला विचित्र लिंक्स आणि मेसेज येत असतील तर हे देखील धोक्याचे लक्षण आहे. फोन वारंवार हँग होणे, अचानक रीस्टार्ट होणे किंवा अॅप्स आपोआप उघडणे आणि बंद होणे हे देखील फोन सुरक्षित नसल्याचे संकेत आहेत.
दुसरीकडे, जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये असे अॅप्स इन्स्टॉल केलेले आढळले जे तुम्ही स्वतः डाउनलोड केलेले नाहीत, तर हे देखील हॅकिंगचा परिणाम असू शकते.
Goole play स्टोअरवरूनच अॅप्स डाउनलोड करा. कोणत्याही थर्ड पार्टी साइटवरून अॅप्स इन्स्टॉल करणे टाळा. नेहमी फोनचे सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स इन्स्टॉल करत रहा. जुने व्हर्जन हॅकर्ससाठी सोपे लक्ष्य असतात. डेटाचा नियमित बॅकअप घ्या जेणेकरून कोणत्याही सायबर हल्ल्याच्या बाबतीत महत्त्वाची माहिती सुरक्षित राहील.
सर्व खात्यांसाठी आणि फोन लॉकसाठी मजबूत पासवर्ड वापरा. तसेच, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) चालू करा. तसेच, सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कचा वापर कमीत कमी करा. हॅकर्ससाठी ओपन वाय-फाय हा सर्वात सोपा मार्ग आहे.
तुमच्या फोनवर अँटीव्हायरस किंवा सुरक्षा अॅप सुरू करा. हे धोकादायक अॅप्स आणि मालवेअर वेळेत ब्लॉक करू शकतात.