भारत-पाकिस्तानची मॅच अन् वनप्लसचा हेडफोन....बास...; तेवढाच जास्त वाटला...

By हेमंत बावकर | Published: September 12, 2023 05:48 PM2023-09-12T17:48:20+5:302023-09-12T17:59:47+5:30

OnePlus Bullets Wireless Z2 ANC Review in Marathi: वनप्लसोबतचा आमचा आजवरचा अनुभव ५०-५० होता. आज त्यात नव्या वनप्लस बुलेट्स झेड२ एएनसीची भर पडली.

सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे अनेक हेडफोन्स उपलब्ध आहेत. लोकांना घेतल्यानंतर त्यातील कमतरता जाणवते मग सिलेक्शन चुकले तर नाही ना असा सवाल पडतो. हळू हळू ते स्वीकारून सरावलेही जाते. वनप्लस देखील अशाच काही ब्रँडपैकी एक आहे, जो प्रमिअम स्मार्टफोनसह वायरलेस हेडफोनही उपलब्ध करतो. परंतू, वनप्लसोबतचा आमचा आजवरचा अनुभव ५०-५० होता. आज त्यात नव्या OnePlus Bullets Wireless Z2 ANC ची भर पडली.

आम्ही जवळपास गेल्या १५ ते २० दिवसांपासून वनप्लसच्या बुलेट वायरलेस झेड२ एएनसी हेडफोन वापरत आहोत. अनुभवाचे बोलायचे झाले तर माझ्याकडे गेल्या तीन वर्षांपासून OnePlus Bullets हेडफोन आणि इअरबड्स होते. यापैकी OnePlus Bullets आजही अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत, परंतू, इअरबड्स झेडनी सहा महिन्यांतच प्राण सोडले होते. तेव्हा कोरोना असल्याने व ग्रामीण भागात असल्याने ना वॉरंटी घेता आली ना गॅरंटी. वाटले २४०० रुपये पाण्यात गेले.

परंतू, सध्या आमच्याकडे असलेला OnePlus Bullets Wireless Z2 ANC चा आम्ही स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप आदींवर वापर करून पाहिला. बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास दोन मोठमोठाले मुव्ही पाहूनही बॅटरी ७० टक्क्यांपेक्षा जास्त उरलेली असायची. आम्ही दिवसभर, दोन दिवस सलग हेडफोन वापरून पाहिले.

बॅटरीने चांगला बॅकअप दिला. जवळपास 20 ते 25 तासांचा. म्हणजे जर तुम्ही थोड्या थोड्या वेळापुरते वापरणारे असाल तर तुम्हाला तीन-चार दिवस किंवा त्याहून जास्त दिवस बॅटरी येऊ शकते. जर तुमच्याकडे फास्ट चार्जर असेल तर १० ते १५ मिनिटांत हा हेडफोन पूर्ण चार्जही होतो.

कॉलिंगवेळी समोरच्याला जाणारा आवाज देखील चांगला आहे. नॉईस कॅन्सलेशन चांगल्या प्रकारे मॅनेज केलेले आहे. एएनसी चालू केल्यास बॅटरी बॅकअप कमी मिळतो. तसेच हा हेडफोन एकाचवेळी दोन डिव्हाईसना जोडता येतो. यासाठी एक खास बटन दिले गेलेले आहे. हे बटन काही सेकंद दाबून ठेवल्यास हेडफोन पेअरिंग मोडमध्ये जातात आणि नंतर तुम्हाला दोनदा प्रेस केल्यावर दोन मोबाईल किंवा एक टिव्ही, एक मोबाईल डिव्हाईस कनेक्ट करता येतात. हा एक प्लस पॉईंट आहे.

OnePlus Bullets Wireless Z2 ANC आम्ही टीव्ही आणि मोबाईल यावर बरेच दिवस वापरून पाहिला. विशेषता भारत-पाकिस्तान मॅचवेळी आम्ही हा हेडफोन टीव्हीवर वापरला. प्रेक्षक जास्त नसल्याने आवाजाचा फिल येत नव्हता, तो मिळविण्यासाठी हा प्रयोग केला. तसेच मोबाईलवरही गाणी ऐकण्यासाठी, कॉलिंगसाठी वापरला. वजनाला हलका असल्याने कानांना ना आवाजाचा त्रास ना वजनाचा त्रास जाणवला.

पाकिस्तानविरोधातील सामन्यावेळी बऱ्यापैकी आवाजाचा फिल या हेडफोनमुळे मिळाला. मोबाईलवर पॉवर अॅम्प अॅपवर आम्ही गाणी ऐकली. यावेळी देखील हेडफोनने निराश केले नाही. परंतू, दोन्हीवेळी आम्हाला थोडा बास जास्त वाटला. वनप्लसने जास्त बास आवडणाऱ्यांसाठीच 12.4mm ड्रायव्हर दिले आहेत. यामुळे बास जास्तच असणार हे नक्की.

जे लोक सतत हेडफोनवरून बोलत असतात, गाणी ऐकत असतात, प्रवास करत असतात त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. संगीत प्रेमींसाठी देखील हा हेडफोन चांगला आहे. टीव्ही पाहताना आजुबाजुचा आवाज नको असेल तर अशांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. दुचाकी किंवा कार चालविताना अनेकजण हेडफोन वापरतात, हे चुकीचे आहे. परंतू, वाऱ्याचा, गोंगाटाचा नॉईस टाळत समोरच्याला नीट आवाज जावा म्हणून हा हेडफोन चांगल्याप्रकारे काम करतो.