स्मार्टफोन चोरी झाला तर घाबरू नका, या गोष्टी करा, मिळू शकतो; माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:21 IST2025-04-12T16:15:34+5:302025-04-12T16:21:07+5:30
फोन थोडा जरी नजरेआड झाला तरी लोक कासाविस होतात. मग हरवला किंवा चोरीला गेला तर? गेले की मग सगळेच... हे पूर्वी व्हायचे.

आजकाल स्मार्टफोन म्हणजे लोकांचा जीव की प्राण असतो. कारण फोटो, व्हिडीओ, सर्वांशी संपर्क आणि बँक अकाऊंट आदींसह महत्वाची डॉक्युमेंटही यामध्ये असतात. हा फोन थोडा जरी नजरेआड झाला तरी लोक कासाविस होतात. मग हरवला किंवा चोरीला गेला तर? गेले की मग सगळेच... हे पूर्वी व्हायचे. आता नाही. कारण तुम्ही या प्रक्रियेद्वारे तुमचा फोन परत मिळवू शकता. कसा तो पाहुया...
दरवर्षी लाखो लोकांचे फोन चोरीला जातात. परंतू, हातात स्मार्टफोन जरी आला तरी त्यांना चोरीला गेलेला फोन परत कसा मिळवायचा याचे किंचितही ज्ञान नसते. यामुळे नवीन फोन घेणार आणि नवीन सिम घेऊन पुन्हा आयुष्य सुरु करणार, हे तेवढे सोपे नाही. महागात पडणारे आहे.
ज्याच्या हाती तुमचा फोन लागला आहे, तो व्यक्ती त्या फोनमधून तुमचा डेटा घेऊन काहीही करू शकतो. अगदी तुमचे फोटो मॉर्फ करून काहीही करेल किंवा देशविघातक कृत्ये करेल आणि तुमचे नाव येईल. ऑनलाईन फ्रॉडही करेल आणि तुम्ही त्यात अडकाल.
फोनमध्ये असलेला वैयक्तिक आणि आर्थिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काही पाऊले उचलावी लागतील. सर्वात आधी सिम ब्लॉक करा, मेल आयडी सोशल मिडियाचे पासवर्ड बदला, बँकेचे पासवर्ड बदला, ऑनलाईन पेमेंट बंद करा, पोलिसांत जात तक्रार नोंदवा.
या नंतर सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे तुमच्या फोनचा आयएमईआय क्रमांक असणे गरजेचे आहे. भारत सरकारच्या CEIR पोर्टलवर जात तिथे तुमचा मोबाईल नंबर आणि आयएमईआय नंबर ब्लॉक करा. हे का करायचे?
जर कोणी तो फोन वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचते व पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचणे सोपे होते आणि तुमचा फोन परत मिळण्याची शक्यता वाढते.
फोन चोरीला जाण्यापूर्वी काय कराल...
फोन चोरीला जाण्याची वाट पाहण्यापेक्षा सावध तो सुखी या म्हणीप्रमाणे तुम्ही जेव्हा तुमच्या हातात फोन असतो तेव्हा एक गोष्ट करू शकता. Google Find My Device किंवा Apple Find My iPhone चा पर्याय तुम्ही सुरु करून ठेवू शकता.
CEIR काय करते...
CEIR वर तक्रार केली की तो फोन भारतात कुठल्याही नेटवर्कवर वापरता येत नाही. परंतू, हा फोन वापरण्याचा प्रयत्न झाला असे पोलिसांना समजते.
फोन परत मिळाला की...
तुमचा फोन परत मिळाला की पुन्हा CEIR पोर्टलवर जात तो अनब्लॉक करता येतो. स्मार्टफोन चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी सरकारने 14422 हा नंबरही दिला आहे.