5G डील: चिनी कंपन्यांना भोपळा! जिओ, एअरटेल, व्होडाफोनने घेतला धक्कादायक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 07:30 PM2022-07-27T19:30:18+5:302022-07-27T19:37:44+5:30

China Role in Indias 5G Service: फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव नुकताच पार पडला आहे. देशातील चार कंपन्यांनी यात भाग घेतला होता. परंतू, यानंतर चीनला जबरदस्त हादरा बसला आहे.

देशात आता ५जी नेटवर्कचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिका, चीन आदी देशांपेक्षा उशिराने जरी येत असले तरी ते व्हाया चीन नाही तर थेट येणार आहे. फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव नुकताच पार पडला आहे. देशातील चार कंपन्यांनी यात भाग घेतला होता. परंतू, यानंतर चीनला जबरदस्त हादरा बसला आहे.

रिलायन्स जिओ, एअरटेल या दोन महत्वाच्या कंपन्यांनी चिनी कंपन्यांना बाजुला सारत 5G इक्विपमेंट पार्टनरची निवड केली आहे. यामध्ये चीनच्या Huawei आणि ZTE सारख्या कंपन्यांना डच्चू देण्यात आला आहे. तर Nokia, Ericsson आणि सॅमसंगने बाजी मारली आहे. नोकिया आणि इरिक्सन या कंपन्यांना सर्वाधिक कंत्राटे मिळाली आहेत.

नोकिया फिनलँडची आहे तर इरिक्सन स्वीडन आणि सॅमसंग कोरियाची कंपनी आहे. नेक्स्ट जनरेशन नेटवर्क रोलआउटमध्ये चिनी कंपन्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. चिनी कंपन्यांना वाटत होते. तर Vodafone Idea 5G उपकरणांसाठी युरोपियन विक्रेत्यांशी चर्चा करत आहे.

व्होडाफोन आयडियाने ज्या सर्कल्सचे उत्पन्न १५ टक्क्यांहून जास्त आहे त्या सर्कल्ससाठी ऑर्डर दिली आहे.

युरोपीय व्हेंडर्सकडून मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला मोबाईल टेलिफोनी यंत्रणा पहिल्यांदा पुरविली जाणार आहे. जिओने 4G नेटवर्कसाठी सॅमसंगची यंत्रणा वापरली होती. सॅमसंग यावेळी एअरटेलला मोबाईल नेटवर्क गियर पुरवणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात एअरटेल १५ हजार ते २० हजार ५जी साईट्सवर काम करणार आहे. यामध्ये मोठ्या शहरांना कव्हर केले जाणार आहे. तर जिओची ऑर्डर यापेक्षा मोठी असणार आहे. यामुळे मोठी शहरे आणि छोट्या शहरांमध्ये देखील जिओची ५ जी सेवा पोहोचू शकणार आहे.

Jio आणि Airtel या दोघांनी अद्याप नेटवर्क उपकरणांसाठी मागणी नोंदविलेली नाही. या ब्रँड्सनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

इकॉनॉमिक टाइम्सनुसार भारती एअरटेलच्या सीनियर एक्जीक्यूटिवने नोकिया, इरिक्सन आणि सॅमसंग सोबत डील झाल्याचे म्हटले आहे. एअरटेल सर्वच व्हेंडर्सला खरेदीची ऑर्डर देणार आहे.

एअरटेल सध्या फोर जी साठी Huawei आणि ZTE ची उपकरणे वापरत आहे. परंतू ती टप्प्या टप्प्याने काढून टाकण्यात येणार आहेत. या दोन्ही कंपन्यांना तीन व्हेंडर्स रिप्लेस करणार आहेत. हेच व्हेंडर्स ५ जी साठी एअरटेलसोबत काम करणार आहेत. दुसरीकडे जिओने एअरटेलपेक्षाही कमी किंमत मोजून Ericsson सोबत डील केली आहे.