झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 14:34 IST2025-09-26T14:18:51+5:302025-09-26T14:34:30+5:30

Zomato Commission Charges on Restaurant: झोमॅटोच्या उच्च कमिशनमुळे रेस्टॉरंट मालक संतापला. ₹२१K विक्रीवर ५४% कपात! कोणत्या शुल्कामुळे रेस्टॉरंट्सला तोटा होतोय, वाचा.

ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म असो की कॅब बुक करण्याचा प्लॅटफॉर्म कशी लुटालूट होते याचा अनुभव सर्वांनीच घेतला आहे. झोमॅटोवरून ग्राहक म्हणून आपल्याला आकारले जाणारे चार्ज, डिलिव्हरी बॉयना दिले जाणारे पैसे याबाबत आपण नेहमीच बातम्या, पोस्ट वाचत असतो. परंतू, पहिल्यांदाच झोमॅटोवरून ऑर्डर आली की लगेच ती तयार करून पाठविणाऱ्या हॉटेलबाबतचे वास्तव समोर आले आहे.

ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) मुळे रेस्टॉरंट्सना मोठी पोहोच मिळत असली तरी, या प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत असलेल्या लहान व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका रेस्टॉरंट मालकाने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडत, ₹२१,००० पेक्षा जास्त विक्री करूनही त्याला अंतिम परतावा (Final Payout) म्हणून ५०% पेक्षाही कमी रक्कम मिळाल्याचे उघड केले आहे.

महेंद्र वड्डेपल्ली नावाच्या रेस्टॉरंट मालकाने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करत झोमॅटोच्या सेटलमेंट ब्रेकडाऊनचा स्क्रीनशॉट शेअर केला. इतक्या मोठ्या प्रमाणात कपात झाल्यानंतर त्याने थेट झोमॅटोला टॅग करत, "रेस्टॉरंट मालक म्हणून आम्ही अशा प्रकारच्या पेआऊटमुळे तोटा सहन करत आहोत. ही अक्षरशः आमचे रक्त शोषून घेणारी प्रक्रिया आहे. हा दरोडा (Robbery) नाही तर काय आहे?" असा संतप्त सवाल केला आहे.

महेंद्र वड्डेपल्ली यांनी शेअर केलेल्या सेटलमेंटनुसार, एका आठवड्याच्या सायकलमध्ये झालेली उलाढाल आणि मिळालेला परतावा (Payout) खालीलप्रमाणे आहे: तपशीलरक्कम (₹) ग्राहकांकडून देय रक्कम (Customer Payable Amount)२१,३८८.७१ सेवा शुल्क आणि पेमेंट शुल्क (Service & Payment Fees)६,०३६.७५ सरकारी शुल्क (Government Charges)२,१२५.५० वाढीव सेवा गुंतवणूक व इतर वजावट (Growth Services & Misc.)३,८६०.३९ रेस्टॉरंट मालकाला मिळालेला अंतिम परतावा९,८३९.६६

याचा अर्थ असा की, रेस्टॉरंटने ₹२१,३८८ रुपयांची विक्री केली, परंतु कंपनीने कमिशन, कर आणि इतर शुल्काच्या नावाखाली जवळपास ₹११,५०० (५४% पेक्षा जास्त) कापून घेतले. यामुळे रेस्टॉरंट मालकाच्या हातात मूळ विक्रीच्या ४६% पेक्षाही कमी रक्कम आली आहे.

या धक्कादायक आकडेवारीमुळे, केवळ मोठे कमिशन (Commission) आणि कर नव्हे, तर 'गुंतवणूक आणि विविध कपाती'च्या नावाखाली होणाऱ्या मोठ्या वजावटीमुळे लहान रेस्टॉरंट्सना आपला नफा टिकवून ठेवणे किती कठीण झाले आहे. अनेक रेस्टॉरंट मालकांसाठी ही ऑनलाइन डिलिव्हरी आता नफ्याऐवजी तोट्याचा सौदा बनू पाहत आहे.

हा मुद्दा व्हायरल झाल्यावर झोमॅटो केअरने तातडीने प्रतिक्रिया दिली, परंतु ती केवळ "आम्ही ईमेलद्वारे तुमच्या प्रश्नाचे निराकरण केले आहे" किंवा "तुमचा रेस्टॉरंट आयडी आम्हाला DM करा" अशा पद्धतीची होती, जी बहुतांश वेळा स्वयंचलित (Automated) असते. यावर कोणताही ठोस आणि सार्वजनिक तोडगा दिला गेलेला नाही. परंतू एकंदरीतच केलेली काटछाट पाहता हॉटेल मालक झोमॅटोवरून यापुढे ऑर्डर स्वीकारतील का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.