'मुख्यमंत्री साहेब! सर्व लग्नांवर तत्काळ रोख लावा, माझ्या गर्लफ्रेंडचेही लग्न थांबेल'; राजस्थानमध्ये पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 10:12 AM2021-05-09T10:12:38+5:302021-05-09T10:22:04+5:30

Lockdown in Rajasthan, Comment on CM Ashok Gehlot post goes Viral: राजस्थानच्या एका तरुणाने मुख्यमंत्र्याकडे अजब मागणी केली आहे. 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी ही फेसबुक पोस्ट केली होती. यावर 4 मे रोजी एक कमेंट आली. ती पाहून कोणालाही हसू आवरणार नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील बहुतांश राज्यांमध्ये हाहाकार उडालेला आहे. अनेक राज्यांत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामध्ये लग्नासाठी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहून राजस्थानच्या गेहलोत सरकारने 5 ते 15 मे असा संपूर्ण लॉकडाऊन लावला आहे.

लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्री गेहलोत यांनी नागरिकांना एक विनंती केली होती. यामध्ये ज्यांच्या घरांमध्ये लग्न समारंभ आहेत त्यांनी तो सध्यातरी पुढे ढकलावा. कोरोना संक्रमनाच्या साखळीला तोडणे गरजेचे आहे. लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीमुळे हे शक्य होणार नाही.

हाच धागा पकडून राजस्थानच्या एका तरुणाने मुख्यमंत्र्याकडे अजब मागणी केली आहे. 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी ही फेसबुक पोस्ट केली होती. यावर 4 मे रोजी एक कमेंट आली. ती पाहून कोणालाही हसू आवरणार नाही.

या कमेंटचा स्क्रीनशॉट बघता बघता एवढा व्हायरल झाला की सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. ही कमेंट अंकुर दौरवाल (ankur dourwal) नावाच्या फेसबुक युजरने केली होती.

''मुख्य़मंत्री साहेब, तुम्हीच लग्नांवर रोख लावा. उद्या माझ्या प्रेयसीचे लग्न आहे, ते थांबेल. तुम्ही एक काम करा आज रात्रीच गाईडलाईन काढा, म्हणजे 5 मे पासून जेवढी लग्ने आहेत ती रद्द होती. अशोकजी प्लीज..''

जेव्हा ही कमेंट सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होऊ लागली तेव्हा अंकुरने ती जवळपास चार तासांनी डिलीट केली. मात्र, या कमेंटचा स्क्रीनशॉट अद्यापही उपलब्ध आहे.

या पोस्टमुळे राजस्थानसह देशभरात अंकुर खूप फेमस झाला. त्याच्याशी एका वृत्तवाहिनीने संपर्क साधला असता त्यांने जे सांगितले ते काही वेगळेच असल्याचे समोर आले.

अंकुरच्या म्हणण्यानुसार त्याचा फोन त्याचा मित्र मोहित मीलने घेतला होता. त्यानेच आपल्यासोबत प्रँक केला आणि माझ्या अकाऊंटवरून पोस्ट केली. मोहित ग्रॅज्युएट असून नोकरी करतो.

या कमेंटमागचे कारण काहीही असले परंतू ती कमेंट डिलीट करेपर्यंत लाखो, करोडो लोकांमध्ये ती चर्चेचा विषय बनली होती. याचा स्क्रीनशॉट आता मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे.

अंकुर हा सीकरहून 10 किमी आत असलेल्या कटराथल गावात राहतो. त्याचा मित्रही त्याच गावात राहतो. अंकुर हा बीएच्या दुसऱ्या वर्षाला आहे.