'माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागणार नाही', राजू शेट्टींच्या मुलाची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 09:55 AM2022-04-29T09:55:40+5:302022-04-29T10:21:42+5:30

भविष्यातील माझ्या वाटचालीने तुमची मान किती उंचावेल हे माहित नाही,पण माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागणार नाही एवढा विश्वास तुमच्या संस्कारांच्या माध्यमातून व्यक्त करतो, असे सौरभने म्हटले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी काही दिवासांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत स्वाभिमान दाखवून दिला. आपण भाजपसोबत जाणार नसल्याचेही राजू शेट्टींनी स्पष्ट केले.

राजू शेट्टींच्या धाडसी निर्णय क्षमतेमुळेच ते राज्यभर ओळखले जातात. आता, त्यांचा मुलगा सौरभ शेट्टी हाही चळवळीत सक्रीय होत आहे. अनेक, कार्यक्रमात आणि संघटनेच्या कामात तो युवकांची फळी निर्माण करताना दिसून येतो.

सौरभने गुरुवार 28 फेब्रुवारी रोजी आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये, राजू शेट्टींच्या संघर्षाची आठवण करुन देत मीही आपल्या पाऊलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करेन, असे त्याने म्हटले

तुमच्या लग्नाला आज 29 वर्षे झाली. या 29 वर्षामध्ये चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना तुम्ही दोघांनी अनेक संकट झेलली. गल्लीतल्या शिवारा पासून ते दिल्लीतल्या

संसदेपर्यंत आयुष्यातील खडतर प्रवास हा एकमेकांच्या साक्षीने झाला. गेल्या 29 वर्षात अनेक जबाबदाऱ्या तुम्ही खांद्यावर घेतल्या मी तेव्हा लहान होतो. पण नक्कीच आज तुमच्या विचारांचा पाईक होऊन चळवळीमध्ये छोटे-मोठे काम करण्याची संधी माझ्यासारख्याला मिळते

गेली अनेक वर्ष तुम्ही कष्टातून मला शिकवलं, मला मोठे केलं. घरात सर्व भावभावात सर्वात लहान असून पण साहेबांनी अनेकांच्या शिक्षणाची आणि राहणीमानाची जबाबदारी आपल्यावर खांद्यावर घेतली. तुमच्या याच शिकवणीतून या समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो या विचारातून वयाच्या 23 व्या वर्षी समाजातील गरजू दोन विद्यार्थ्यांची

संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी घेऊ शकलो हा एक तुमच्या संस्कारातील मोठा भाग आहे. इथून पुढच्या काळात तुमच्या जबाबदाऱ्यांचे ओझं माझ्या खांद्यावर घेण्यासारखी ताकद माझ्या अंगी यावी आणि तुम्ही दोघांनी केलेल्या कष्टाला न्याय मिळावा त्याकरता माझा एक छोटा प्रयत्न म्हणून नक्कीच मी काही ना

काही तरी प्रयत्न करत राहीन. आज पर्यंत जाईन तिथं राजू शेट्टींचा मुलगा म्हणून मान मिळाला, तो टिकवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. भविष्यातील माझ्या वाटचालीने तुमची मान किती उंचावेल हे माहित नाही,पण माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागणार नाही एवढा विश्वास तुमच्या संस्कारांच्या माध्यमातून व्यक्त करतो, असे सौरभने म्हटले

आयुष्याच्या एका टप्प्यावर तुमच्या माझ्याकडून असनाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेन असा विश्वास देतो. आई बाबा तुम्हा दोघांनाही 29 व्या लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अशी पोस्ट सौरभने फेसबुकवर लिहिली आहे.

मुलगा सौरभने अतिशय भावूक पोस्ट लिहित आई-वडिलांना 29 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.