womens day २०२६ - त्यांनी सुरवात केली म्हणून शक्य झालं, विविध क्षेत्रात पहिले पाऊल टाकणाऱ्या ६ कर्तबगार धाडसी महिला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2026 13:12 IST2026-03-08T13:02:23+5:302026-03-08T13:12:22+5:30
Women’s Day 2026: 6 Inspiring First Women Who Broke Barriers in Different Fields, Women Pioneers Who Made History : या ६ महिलांनी घडवला इतिहास. विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान फार मोलाचे.

समाजजीवन, शिक्षण, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात काही महिलांनी 'पहिलं पाऊल' टाकत इतिहास घडवला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण, काम आणि संधी मिळत नव्हत्या. तरीही धैर्य, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या महिलांनी स्वतःचा मार्ग तयार केला आणि पुढच्या पिढ्यांसाठी नवे दरवाजे उघडले.

आनंदी जोशी हे नाव फक्त चित्रपटापुरते मर्यादित राहत नाही. त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात. १८६५ साली जन्मलेल्या आनंदीबाईंनी अनेक अडचणींवर मात करत अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले. १८८६ साली त्यांनी डॉक्टरची पदवी मिळवली. त्या काळात महिलांनी परदेशात जाऊन शिक्षण घेणे अत्यंत दुर्मिळ होते. त्यामुळे त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते.

महिलांच्या शिक्षणाचा मार्ग खुला करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे योगदान अतिशय मोठे. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. १८४८ साली पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात मुलींना शिक्षण देणे समाजाला मान्य नव्हते, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी शिक्षणाचा दीप पेटवून ठेवला.

भारतीय चित्रपटसृष्टीत महिलांचा प्रवेश होणेही सोपे नव्हते, त्या काळात महिलांनी अभिनय करणे समाजात स्वीकारले जात नव्हते. अशा परिस्थितीत दुर्गाबाई कामत यांनी चित्रपटात सुंदर भूमिका साकारल्या. त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. त्यांनी महिलांसाठी अभिनय क्षेत्राचा मार्ग खुला केला.

मराठी साहित्यात काशीबाई कानिटकर यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. त्या मराठीतील अग्रगण्य महिला कादंबरीकार मानल्या जातात. त्या काळात महिलांना शिक्षणाची संधी फार कमी असतानाही त्यांनी स्वतः अभ्यास करून लेखन सुरू केले. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये स्त्रियांचे जीवन, शिक्षण आणि समाजातील प्रश्न यांचा प्रभावी वेध घेतलेला दिसतो.

कमलाबाई गोखले ह्यांनीही रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात लहान वयात काम करायला सुरवात केली. त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या बाल अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. रंगभूमीवर स्वाभिमानाने उभे राहून त्यांनी भूमिका साकारल्या.

















