Valentines Day 2026 : ‘या’ ५ देशांत व्हॅलेण्टाइन्स डे सेलिब्रेशन म्हणजे गंभीर गुन्हा, विसरा गुलाब-हार्टचे फुगे-खा तुरुंगाची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2026 15:31 IST2026-02-04T15:25:08+5:302026-02-04T15:31:03+5:30
Valentines Day 2026: In these 5 countries, celebrating Valentine's Day is a serious crime : व्हॅलेण्टाइन्स साजरा केल्याचा दंडच नाही तर थेट तुरुंगवास. पाहा कोणत्या देशात आहे असा कायदा.

१४ फेब्रुवारीला जग गुलाबी रंगात रंगलेलं असताना, काही देशांमध्ये मात्र हा दिवस प्रेमाचा नसून कायद्याच्या चौकटीत अडकलेला असतो. तिथे गुलाब, गिफ्ट्स, हृदयाच्या आकाराचे फुगे नाहीत, उलट त्या दिवशी प्रेम व्यक्त करणं गंभीर गुन्हा मानला जातो. संस्कृती, धर्म आणि सामाजिक नियम यांमुळे काही देशांमध्ये व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करणं थेट किंवा अप्रत्यक्षपणे गुन्ह्याच्या कक्षेत येतं.

सौदी अरेबिया या देशात अनेक वर्षे व्हॅलेण्टाइन्स डेवर कठोर निर्बंध होते. सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं, गुलाब देणं किंवा व्हॅलेण्टाइन्सशी संबंधित वस्तू विकणं हे कायद्याने चुकीचं मानलं जायचं. प्रेम हा खासगी भाव असावा, सार्वजनिक प्रदर्शन नको अशी भूमिका इथल्या नियमांमागे होती. काही ठिकाणी या नियमांचं उल्लंघन केल्यास दंड किंवा चौकशीसुद्धा होत असे. अलीकडच्या काळात थोडी शिथिलता आली आहे. तरी अजूनही हा दिवस इथे मोकळेपणाने साजरा होत नाही.

इराणमध्ये व्हॅलेण्टाइन्स डे हा पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव मानला जातो. त्यामुळे अधिकृत पातळीवर या दिवसाला मान्यता नाही. प्रेम साजरं करणं चुकीचं नाही, पण त्याला व्हॅलेण्टाइन्सचं लेबल लावणं, सार्वजनिक कार्यक्रम, गिफ्ट्स किंवा खास सजावट यावर बंदी आहे. काही वेळा दुकानदारांवर कारवाई होते, तर तरुणांना समज दिली जाते. इथे प्रेम 'पाश्चिमात्य पद्धतीने' साजरं करणं मान्य नाही.

पाकिस्तानमध्येही व्हॅलेण्टाइन्स डे हा वादाचाच विषय. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी व्हॅलेण्टाइन्स सेलिब्रेशनवर बंदी घालण्यात आली. टीव्ही, रेडिओ, जाहिराती यांमध्येही या दिवसाचा प्रचार थांबवण्यात आला. प्रेम व्यक्त करणं खासगी आयुष्याचा भाग असावा, असं इथलं सामाजिक आणि धार्मिक मत आहे. त्यामुळे रस्त्यावर गुलाब देणं किंवा जोडप्यांनी मोकळेपणाने सेलिब्रेट करणं धोक्याचंच मानलं जातं.

इंडोनेशियामधील आचे प्रांतात परिस्थिती आणखी कठोर आहे. इथे इस्लामिक कायदे लागू असल्याने प्रेमसंबंध, डेटिंग किंवा व्हॅलेण्टाइन्स सेलिब्रेशन याकडे धर्मविरोधी कृती म्हणून पाहीलं जातं. काही वेळा जोडप्यांना ताब्यात घेणं, समज देणं किंवा शिक्षा देण्याच्या घटना समोर आल्या आहेत. देशभर व्हॅलेण्टाइन्सवर थेट बंदी नसली, तरी या प्रांतात तो दिवस साजरा करणं मोठा धोक्याचंच ठरतं.

मलेशियामध्येही व्हॅलेण्टाइन्स डे विरोधात धार्मिक संस्थांनी अनेकदा चळवळी केल्या आहेत. येथील समाजात हा दिवस अनैतिक वागणुकीला प्रोत्साहन देतो, असं मानलं जातं. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन, पार्टी किंवा जोडप्यांचे कार्यक्रम यावर कारवाई होऊ शकते.

















