दिवसभर खूप थकूनही रात्री झोप का येत नाही? पाहा झोप न येण्याची कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:11 IST2026-03-28T10:21:37+5:302026-03-28T14:11:30+5:30

Sleepless Causes : बेडवर पडूनही झोप येत नाही, सतत विचार सुरूच राहतात. ही समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे, विशेषतः तणावपूर्ण जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये. झोपेची कमतरता फक्त थकवा वाढवत नाही, तर मेंदू, मूड आणि एकूण आरोग्यावरही वाईट परिणाम करते.

Sleepless Causes :दिवसभराची धावपळ, कामाचा ताण, ट्रॅफिक, मोबाईल आणि जबाबदाऱ्या यामुळे आपण खूप थकतो. वाटतं की बेडवर पडताच लगेच गाढ झोप लागेल, पण अनेकदा उलट होतं. शरीर थकलेलं असतं, पण मन शांत होत नाही. बेडवर पडूनही झोप येत नाही, सतत विचार सुरूच राहतात. ही समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे, विशेषतः तणावपूर्ण जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये. झोपेची कमतरता फक्त थकवा वाढवत नाही, तर मेंदू, मूड आणि एकूण आरोग्यावरही वाईट परिणाम करते.

दिवसभराची चिंता, कामाचा दबाव किंवा खाजगी समस्या मेंदूला शांत होऊ देत नाहीत. जेव्हा आपण तणावात असता, तेव्हा शरीरात स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल वाढतात, जे आपल्याला सतर्क ठेवतात. हेच कारण आहे की, आपण थकलेलो असतानाही रात्री झोप येत नाही. अशात मोठा खोल श्वास घ्या आणि हळूवार सोडा. थोडावेळ ही प्रक्रिया करा. तसेच आपले विचार डायरीत लिहून काढा.

झोपण्याच्या वेळेपर्यंत फोन बघणंही एक मोठी समस्या बनली आहे. मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉपमधून निघणारा प्रकाश हा झोपेसाठी आवश्यक हार्मोन मेलाटोनिन कमी करतो. त्यामुळे झोपण्याच्या साधारण १ तासआधी स्क्रिन बंद करा. पुस्तक वाचा, मंद प्रकाशाचा लाइट लावा याने आराम मिळेल.

आपल्या शरीराची एक अंतर्गत घड्याळ असते, जी ठरवते की कधी झोपायचं आणि कधी जागायचं. पण रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने, कधी लवकर तर कधी उशिरा झोपल्याने ही घड्याळ बिघडते. त्यामुळे रोज झोपण्याची एक वेळ फिक्स ठेवा.

अनेकदा असं होतं की, बेडवर पडताच मेंदूत वेगवेगळे विचार धावू लागतात. जुन्या गोष्टी, भविष्याची चिंता, कामाचं प्लानिंग. या गोष्टींमुळे मेंदू रात्री सक्रिय राहतो. या समस्या दूर करण्यासाठी प्राधान्य कोणत्या कामांना द्यायचं याची यादी बनवा. स्वत:ला सांगा की, आता आरामाची वेळ आहे. झोपताना हलकं - शांत संगीत ऐका.

जर खोली फार गरम असेल, जास्त प्रकाश असेल किंवा आवाज जास्त असेल तर मेंदूला आरामाचा संकेत मिळत नाही. अशात खोली थंड ठेवा, शांत ठेवा आणि अंधार करा. याने आपल्याला झोप लागण्यास मदत मिळेल.

रात्री उशिरा जेवण, कॅफीन आणि व्यायामाची कमतरता यामुळे देखील झोप प्रभावित होते. अशात रात्री हलकं जेवण करा, लवकर जेवा. झोपण्याआधी चहा - कॉफी काही घेऊ नका. दिवसा थोडी फिजिकल अॅक्टिविटीही करा.