The Family Man: डोन्ट वरी जेके सब संभाल लेगा! त्या जेके अर्थात शारिब आणि नसरीनची लव्हस्टोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2025 13:35 IST2025-12-05T13:26:46+5:302025-12-05T13:35:58+5:30
The Family Man : Don't worry, JK will take care of everything! The love story of Sharib and Nasreen: खऱ्या आयुष्यातही ठरला हिरो. पाहा शारिबची लव्हस्टोरी.

सध्या सगळीकडे क्रेझ आहे ती 'द फॅमिली मॅन' या वेबसिरीजची. श्रीकांत तिवारीच्या प्रेमात तर सगळे आहेतच पण त्यापेक्षा लोकप्रिय ठरलेले पात्र म्हणजे जेके. अनेकदा साईड रोल्स मेन कॅरेक्टरपेक्षा जास्त प्रभावी ठरते तसेच काहीसे या पात्राचे झाले.

जेकेची भूमिका साकारणारा अभिनेता शारिब हाश्मी एक उत्तम कलाकार आहे. पण तुम्हाला माहिती आहे की मालिकेत लग्न करण्यासाठी आतुर असलेला जेके खऱ्या आयुष्यात मात्र एक आदर्श नवरा आहे. आज प्रसिद्ध असलेल्या शारिबच्या पत्नीने एकेकाळी दागिने विकून घर चालवले होते.

शारिबचे वडील सिनेमा क्षेत्रात बी.आर चोप्रा यांच्यासोबत काम करायचे. त्यामुळे शारिबला लहानपणापासूनच या क्षेत्राची आवड होती. २००३ मध्ये नसरीनशी त्याचे लग्न झाले. त्यांना दोन मुले झाली आणि त्यांनी छान मध्यमवर्गीय आयुष्य जगायला सुरवात केली.

शारिब टी.व्ही शोसाठी लेखक म्हणून काम करत होता, मात्र त्याची स्वप्न वेगळीच होती. त्याने व्यवस्थित पगार मिळत असतानाही नोकरी सोडून अभिनय निवडण्याचा निर्णय घेतला. घर कसे चालेल? मुलांचे काय होईल ? असे प्रश्न न विचारता नसरीनने त्याला प्रोत्साहन दिले.

पण पैशाचे सोंग आणता येत नाही. घर चालवण्यासाठी पैसे तर हवेच, शारिबचे प्रयत्न चालू असताना नसरीन घर, मुले सांभाळून नोकरीला लागली. दागिने विकले आणि घरही विकावे लागले. नसरीनने शांतपणे सारे सांभाळत शारिबला तू प्रयत्न करत राहा मी आहे, असा आधार दिला.

स्लमडॉग मिलिनियरमध्ये त्याला अगदी लहान भूमिका करायला मिळाली, चित्रपट गाजला पण शरिबला त्याचा फायदा झाला नाही. नंतर २०१४ मध्ये फिल्मीस्तानमध्ये शारिबने केलेल्या भूमिकेमुळे त्याचा चेहरा थोडा फार ओळखीचा झाला.

आयुष्य जरा सुरळीत व्हायला लागले, आता नसरीनला आनंदात ठेवीन काही त्रास होऊ देणार नाही असे शारिबने ठरवले मात्र नसरीनला ओरल कॅन्सर डिटेक्ट झाला. शारिबच्या पायाखालची जमिनच सरकली. नसरीनची सगळी काळजी त्याने घेतली. तिला काहीच कमी पडू दिले नाही.

नंतर द फॅमिली मॅनसाठी शारिबला ऑफर मिळाली आणि त्याचे पात्र कोणीच विचार केला नव्हता एवढे गाजले. सिरिजचा हिरो जरी शारिब ठरला असला तरी त्याच्या आयुष्यातील खरी हिरो नसरीन आहे. चार वेळा ऑपरेशनमधून जातानाही शारिबसाठी खंबीर उभी होती.

















