विकतसारखी लालचुटुक, चमचमीत पावभाजी करण्यासाठी १० टिप्स! पोटभर पावभाजी खाण्याचा लुटा मनमुराद आनंद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2026 17:15 IST2026-04-01T17:01:12+5:302026-04-01T17:15:52+5:30

street food style pav bhaji recipe : How To Make Hotel Style Pav Bhaji At Home : street food style pav bhaji recipe : घरी केलेल्या पावभाजीला गाड्यावर मिळते तशी चव हवी असेल तर खास ट्रिक्स...

'पावभाजी' हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच विशेष आवडीचा पदार्थ. अनेकदा आपण हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर गेल्यावर तिथल्या पावभाजीचा तो गडद लाल रंग आणि विशिष्ट चव पाहून त्या पावभाजीच्या प्रेमातच पडतो...परंतु घरी कितीही प्रयत्न करूनही तशी चव आणि रंग येत नाही, अशी अनेकांची तक्रार असते(restaurant style pav bhaji making tips)

बाहेर गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये विकत मिळते अगदी तशाच चवीची आणि लालचुटुक रंगांची चमचमीत पावभाजी घरच्याघरीच करण्यासाठी खास टिप्स पाहूयात...

पावभाजीला हॉटेलसारखा लाल भडक रंग हवा असेल तर कृत्रिम रंग वापरण्याऐवजी भाज्या उकडताना त्यात बीटाचे दोन - तीन काप टाका. यामुळे चव बिघडत नाही आणि रंगही छान येतो तसेच यामुळे नॅचरल लाल रंग येतो.

हॉटेलमध्ये कांद्यापेक्षा टोमॅटोचे प्रमाण जास्त ठेवले जाते. यामुळे भाजीला छान आंबट-गोड चव आणि दाटपणा येतो. टोमॅटो एकदम बारीक चिरून किंवा प्युरी करून वापरा.

भाज्यांसोबत सिमला मिरची उकडण्याऐवजी, ती एकदम बारीक चिरून कांद्यासोबत तेलात परता. यामुळे भाजीला एक विशिष्ट 'हॉटेल स्टाईल' सुगंध येतो जो उकडल्याने येत नाही.

पावभाजीमध्ये बटाट्याचे प्रमाण जास्त ठेवावे, ज्यामुळे भाजीला छान दाटपणा येतो. पण फुलकोबी, मटार आणि गाजर यांचे प्रमाण संतुलित ठेवा जेणेकरून मूळ चव टिकून राहील.

फोडणी देताना पावभाजी मसाला कधीही थेट तेलात टाकू नका, तो जळण्याची शक्यता असते. थोड्या पाण्यात मसाला कालवून मग फोडणीत टाकावा, यामुळे मसाल्याचा सुगंध आणि चव टिकून राहते.

पावभाजीची खरी चव बटरमध्ये असते. फोडणी देताना थोडे तेल आणि जास्त बटर वापरा. तसेच, भाजी तयार होत आली की शेवटी हातावर चोळून कसुरी मेथी आणि भरपूर कोथिंबीर टाका, यामुळे हॉटेलसारखा खमंग सुवास येतो.

भाज्या उकडल्यानंतर त्या गरम असतानाच व्यवस्थित स्मॅश करा. भाजी जेवढी एकजीव होईल, तेवढी ती खायला चविष्ट लागेल.

फोडणीमध्ये आलं - लसणाची पेस्ट ताजी वापरल्यास भाजीला अधिक चांगली चव येते. फोडणी देताना कांदा पूर्ण गुलाबी झाल्यावर ही पेस्ट टाका आणि तिचा कच्चा वास जाईपर्यंत नीट परता. लसणाचे प्रमाण थोडे जास्त ठेवल्यास चव अधिक खुलते.

शक्य असल्यास पावभाजी मोठ्या लोखंडी तव्यावर बनवा. लोखंडी तव्यावर भाजी परतल्यामुळे तिला हॉटेलसारखा 'स्मॉकी' फ्लेवर आणि काळपट-लाल रंग येतो.

भाजी खूप घट्ट वाटत असेल, तर त्यात कधीही साधे गार पाणी टाकू नका. नेहमी कोमट किंवा गरम पाणीच वापरा. यामुळे भाजीची चव आणि टेक्श्चर बिघडत नाही. भाज्या उकडल्यानंतर जे पाणी उरते, ते फेकून न देता भाजीचा घट्टपणा कमी करण्यासाठी वापरा. त्या पाण्यात भाज्यांचा सर्व अर्क असतो, ज्यामुळे चव टिकून राहते.

पाव नुसते बटरवर गरम करू नका. तव्यावर थोडे बटर, पावभाजी मसाला आणि थोडी कोथिंबीर टाका आणि त्यावर पाव गरम करा. याला 'मसाला पाव' म्हणतात, जो पावभाजीची चव दुप्पट करतो.