Nikki Pradhan : ऐतिहासिक पराक्रम! निक्की प्रधानने रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये खेळली २०० सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:05 IST2026-03-13T15:48:40+5:302026-03-13T16:05:33+5:30
Nikki Pradhan : भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू निक्की प्रधान हिने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे.

झारखंडच्या खूंटी जिल्ह्यातील हेसल गावाची रहिवासी असलेली भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू निक्की प्रधान हिने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. निक्कीने आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये २०० सामने पूर्ण करून इतिहास रचला.

निक्कीने ही कामगिरी हैदराबाद येथे आयोजित 'हॉकी विश्वचषक पात्रता २०२६' दरम्यान केली. वेल्सविरुद्धच्या सामन्यात निक्की जशी मैदानात उतरली, तसा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा २०० वा सामना ठरला. भारतीय हॉकी संघाच्या विजयाने हा खास क्षण अधिकच संस्मरणीय केला.

या ऐतिहासिक क्षणी हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंह यांनी मैदानावरच निक्की प्रधानला 'NIKKI 200' लिहिलेली विशेष जर्सी देऊन सन्मानित केलं. सातत्यपूर्ण मेहनत आणि समर्पणाने भारतीय संघात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या खेळाडूचा हा गौरव होता.

या प्रसंगी निक्कीचे सुरुवातीचे प्रशिक्षक रावजी देखील उपस्थित होते. रावजी यांनीच पहिल्यांदा निक्कीमधील प्रतिभा ओळखून तिची 'राजकीय बालिका उच्च विद्यालय, बरीयातू हॉकी सेंटर'साठी निवड केली होती.

आपल्या शिष्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढी मोठी कामगिरी केल्याचं पाहून त्यांनी निक्कीला आशीर्वाद दिले. निक्की प्रधानचा जन्म ८ डिसेंबर १९९३ रोजी खूंटी जिल्ह्यातील हेसल गावात झाला.

अत्यंत साध्या परिस्थितीतून आलेल्या निक्कीने जिद्द आणि शिस्तीच्या जोरावर हॉकी विश्वात आपले स्थान निर्माण केलं. २०१६ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तिला भारतीय महिला हॉकी संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. तेव्हापासून ती सातत्याने संघाचा महत्त्वाचा भाग आहे.

२०१६ चे रिओ ऑलिम्पिक तिच्या कारकिर्दीतील मोठा टप्पा ठरलं. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी निक्की प्रधान ही झारखंडची पहिली महिला हॉकी खेळाडू ठरली. याचसोबत झारखंडकडून ऑलिम्पिक खेळणारी ती सहावी हॉकीपटू बनली.

निक्कीने आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने २०१६ आशिया चषक (सुवर्णपदक), २०१८ महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी (रौप्य), २०२३ रांची येथील आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी (सुवर्ण) आणि २०२५ महिला आशिया चषक (रौप्य) जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य म्हणून कामगिरी बजावली आहे.

या यशाबद्दल निक्की प्रधान म्हणाली, "२०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणं हा माझ्यासाठी अत्यंत भावूक आणि अभिमानाचा क्षण आहे. मी माझे कुटुंब, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांची आभारी आहे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा प्रवास शक्य झाला. झारखंडच्या मातीतून मिळालेली ताकदच मला पुढे जाण्याची प्रेरणा देते."

हॉकी झारखंडचे सरचिटणीस विजय शंकर सिंह म्हणाले, "निक्की प्रधानने २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळून झारखंडची मान उंचावली आहे. तिचे यश राज्यातील तरुण खेळाडूंसाठी मोठी प्रेरणा आहे. आम्हाला खात्री आहे की, ती आगामी काळातही भारतीय संघासाठी अशीच शानदार कामगिरी करत राहील."

निक्की प्रधानची ही कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध करतं की, झारखंडच्या भूमीत हॉकीचं टॅलेंट आहे, जे देशाला सातत्याने नवे सर्वोत्तम खेळाडू देत आहे.

















