सहलीला जाताना मुलांसाठी सोबत असू द्यावे 'हे' घरगुती पदार्थ, भूक भागविणारा पौष्टिक खाऊचा डबा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2025 16:58 IST2025-05-06T16:51:32+5:302025-05-06T16:58:10+5:30

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक जण सहकुटूंब प्रवासाला निघतात. प्रवासाची मजा काही वेगळीच असते. ज्या ठिकाणी जाऊ तिथले वेगवेगळे पदार्थ चाखून पाहण्याची तर गंमतच वेगळी. पण सोबत जर लहान मुलं असतील तर मात्र त्यांच्या खाण्यापिण्याची थोडी सोय करावीच लागते.(kids Toddler Foods To Carry While Travelling)
कारण प्रवासात त्यांना वेगवेगळे पदार्थ खाणं बऱ्याचदा सहन होईलच असं नसतं. शिवाय मुलांना कधीही भूक लागते. त्यामुळे प्रवासात जर मुलं सोबतीला असतील तर हे काही घरगुती, पौष्टिक पदार्थ नक्की सोबत घ्या..(Healthy Foods to Pack When You Travel)
सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे चिवडा. मग तुम्ही तो पाेह्याचा, मुरमुऱ्याचा, मक्याचा असा कशाचाही घेऊ शकता..
तूप लावून भाजून घेतलेले मखाना, मखान्याचे लाडू असे पदार्थही सोबत न्यायला चांगले आहेत.
लाडू प्रकारही पौष्टिक आणि मुलांना आवडणारे असतात. बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, मुगाच्या डाळीचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, सुकामेव्याचे लाडू असे तुम्हाला सोपे पडतील ते लाडू सोबत ठेवा. मुलांनी एक लाडू तोंडात टाकला तरी पोटाला बराच आधार होतो.
गुळाच्या पाण्यात केलेल्या गोड पुऱ्याही ३ ते ४ दिवस टिकतात. त्यामुळे प्रवासासाठी तो एक चांगला पदार्थ ठरू शकतो.
सातूचं पीठ देखील अतिशय पौष्टिक असतं. शिवाय शरीरातली उष्णता कमी करण्यासाठीही मदत करतं. आयत्यावेळी दूधात किंवा पाण्यात कालवून तुम्ही ते मुलांना खायला देऊ शकता.
गुजराती पद्धतीचे मेथीचे थेपले हा देखील प्रवासात न्यायला एक चांगला पदार्थ आहे. थेपलेही २ ते ३ दिवस खराब होत नाहीत.
याशिवाय खाकरा, चिरोटे, चकल्या, शंकरपाळे असे फराळाचे पदार्थही सोबत असू द्या. असे पदार्थ मुलांना तर होतातच पण मोठ्या मंडळींनाही प्रवासाचा आनंद घेत अधूनमधून तोंडात टाकायला बरे असतात.