फराळाचे पदार्थ तळताना हातावर गरम तेल उडालं? न घाबरता ४ गोष्टी करा, आग कमी होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2025 17:53 IST2025-10-17T17:48:27+5:302025-10-17T17:53:42+5:30

दिवाळीच्या फराळामधले चकली, शेव, अनारसे, शंकरपाळे असे कित्येक पदार्थ तळूनच घ्यावे लागतात. थाेडं दुर्लक्ष झालं तर गरम, उकळतं तेल हातावर उडण्याची भीती असतेच. अशा कित्येक घटनाही आपण ऐकलेल्या आहेतच. असं काही आपल्या बाबतीत झालं तर ऐनवेळी घाबरून न जाता काय करायचं ते पाहा..

जर तुमच्या हातावर तेल उडालच तर सगळ्यात आधी थंड पाण्याचा नळ सोडा आणि त्याच्याखाली थोडावेळ हात धरा. त्याठिकाणचा दाह, जळजळ कमी होण्यास मदत होईल.

तुमच्याघरात जर एखादं ॲण्टीसेप्टिक क्रिम असेल तर ते आधी त्या जखमेवर लावा. पण जर क्रिम नसेल तर फ्रिजमधलं थंड दही घेऊन जखमेवर लावलं तरी चालेल.

कोरफडीचा ताजा गर काढून तो जखमेवर अलगद लावा. जर तो नसेल तर बाजारात मिळणारं ॲलोव्हेरा जेल लावलं तरी चालेल. पण त्या जेलमध्ये खूप केमिकल्स नाहीत, हे एकदा तपासा. नाहीतर थंड वाटण्याऐवजी त्याचा त्रासच होऊ शकतो.

घरातलं साजूक तूप जखमेवर लावल्यासही जखमेच्या ठिकाणची जळजळ कमी होण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे गुलाबपाणी घरात असेल तर ते ही थोडं जखमेवर लावा. पण हे सगळे प्रथमोपचार आहेत. हात पोळल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा आणि योग्य ते औषध, मलमपट्टी करून घ्या.